आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद भोवला; दुकान पाडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जुनाकापड बाजारातील एका जोडे चपलाचे दुकानावर गुरुवारी महापालिकेचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी पोहोचले. मात्र, दुकानमालकाने कारवाई करण्यास मज्जाव केला. संपूर्ण शहरातील पोलिसही महापालिकेेच्या कारवाईला मदत करण्यासाठी पोहोचले. कारवाईदरम्यान, तणावसदृश्य परिस्थिती निवळत नाही, तोच पोलिसांना शिवीगाळ झाल्यामुळे प्रकरण तापले आणि गजराज दुकानावर आदळला. या कारवाईमुळे जुना कापड बाजाराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
मंजूर नकाशापेक्षा जास्तीचे बांधकाम असल्याची तक्रार एका नगरसेविकेने महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्या तक्रारीच्या आधारावरून महापालिका प्रशासनाने चार वेळा दुकानाचे मालक ईश्वर भागवाणी अमित भागवाणी यांना सूचना दिल्या होत्या. अतिक्रमित असलेले बांधकाम पाडण्यासाठी त्यांना सहा महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही स्वत:हून अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे गुरुवारी अतिक्रमणविरोधी पथक दुपारी वाजता जुना कापड बाजारातील भागवाणी यांच्या दुकानासमोर पोहोचले. अतिक्रमण कारवाई सुरू करणार तोच दुकानमालकांकडून आणि त्यांच्या माणसांकडून कारवाईस विरोध झाला. परिस्थिती हाताबाहेर पोहोचत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. या वेळी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी आणि आरसीपीचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला दुकानमालकाने कारवाईस विरोध केला. माझ्या एकाच्याच दुकानावर कारवाई कशी, असा प्रश्न केल्यामुळे काहीशी गोंधळाची अवस्था झालेल्या अतिक्रमण विभागासमोर प्रश्न निर्माण झाला होता. दुकानाचे फलक काढल्यानंतर दुकानमालक आणि त्याचे कामगार आडवे झाल्याने दोन दिवसांचा अवधी देण्यात यावा. यावर विचार सुरू असतानाच महापालिकेने एक पाऊल मागे घेतले. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांना दुकानमालकाच्या माणसांकडून शिवीगाळ झाल्यामुळे पोलिस संतप्त झाले. या वेळी आरसीचे जवान जमाव पांगवण्यासाठी आणि दुकानात घुसले. हीच वेळ साधत गजराज दुकानावर आदळला आणि कारवाई सुरू झाली.

३५४.४९ चौरस मीटर बांधकाम अवैध : ईश्वरभागवाणी आणि अमित भागवाणी यांनी मंजूर नकाशापेक्षा ३५४.४९ चौरस मीटर अवैध बांधकाम केले आहे. समोरील आणि मागील अशा दोन्ही बाजूने हे अतिक्रमण आहे. वेळोवेळी नकाशे सादर करण्याचे आदेश दिले असतानाही त्यांनी नकाशे सादर केले नाही, अशी माहिती अतिक्रमण विभागाने दिली आहे.

पोलिसांना नव्हती पूर्वसूचना : अतिक्रमणविभागाची कारवाई महापालिका प्रशासनाने सुरू केली. कारवाईपूर्वी पोलिस बंदोबस्तासाठी पोलिसांना पत्र देणे आवश्यक असते. मात्र, या वेळी तसे पत्र देण्यात आले नव्हते. त्यामुळे कारवाईस विरोध झाल्यामुळे आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांना कळवण्यात आले. त्यामुळे शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे ठाणेदार आणि त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला होता. पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार, सुभाष माकाेडे, रियाज शेख, विनोद ठाकरे, सी. टी. इंगळे, शिरीष खंडारे यांच्यासह आरसीपीचे जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांच्या वाट्याला जाणे कसे महागात पडते, हे या कारवाईवरून लक्षात आले. प्रकरण मिटले असताना काहींनी पोलिसांना शिवीगाळ केली. त्यामुळे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि दोन दिवसांचा कालावधी मिळाला असतानाही अतिक्रमण विभागाच्या कारवाईला अखेर सामोरे जावे लागले. पोलिसांशी पंगा घेणे महागात पडल्याची चर्चा होती.

दुकानदार काही दुकानदारांनी कारवाई रोखण्याची पोलिसांना विनंती केली. मात्र, त्यांनी हस्तक्षेप करू शकत नसल्याचे उत्तर दिल्याने पोलिसांना शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे पाेलिस संतापले. आरसीपीच्या काही जवानांनी दुकानात जाऊन काहींवर लाठीमार केला.
जुन्या कापड बाजारात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला विरोध करताना शू मॉलचे मालक त्यांचे समर्थक.