आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-सेना युतीसाठी लवकरच होणार पदाधिकाऱ्यांमध्ये बोलणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एकीकडे कॉग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे संकेत प्राप्त झाले असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीबाबतही बोलणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना शिवसेनेसोबत चर्चा करण्याचे आदेश दिले असून, ही चर्चा केव्हाही होऊ शकते. दरम्यान, भाजपच्या एका गटाला तर शिवसेनेच्याही एका गटाला युती हवी आहे. त्यामुळे युती होणार की नाही? ही बाब येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. 
अकोला महापालिका अस्तित्वात आल्यापासून भाजप -सेनेची महापालिका निवडणुकीत युती झालेली आहे. २००२ मध्येही युतीचा फायदा होऊन भाजपचे १८ तर शिवसेनेचे १३ नगरसेवक निवडून आले होते. २००७ मध्ये भाजपला मात्र चांगला फटका बसला भाजपचे केवळ १२ तर सेनेचे नगरसेवक निवडून आले. परंतु, २०१२ च्या निवडणुकीत भाजपच्या स्थितीत सुधारणा झाली. भाजपचे १८ तसेच बंडखोर निवडून आले तर सेनेला मात्र जागांवरच समाधान मानावे लागले. विधान सभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या जोरदार यशामुळे भाजपच्या अनेक नेत्यांची मानसिकता एकला चलो रे ची आहे. नगरपालिका निवडणुकीतही जिल्ह्यात भाजपने शिवसेनेशी युती केली नव्हती. तर महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्यातर युती नको, असेच मत भाजपच्या काही नेत्यांनी व्यक्त केले होते. तर शिवसेनेच्या एका गटाला युती हवी होती. दरम्यान महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्या नंतरही युती बाबत चर्चा सुरु झाली नाही. एवढेच नव्हे तर दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज स्विकारले. त्यामुळे युती बाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेने सोबत युती करण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले असले तरी ज्या ठिकाणी निवडणुका आहेत. त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांनी शिवसेने सोबत युतीबाबत चर्चा करण्याचे आदेश दिले आहे. युती होईल की नाही, हा भाग नंतरचा असला तरी मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे युतीबाबत शिवसेनेशी चर्चा केली जाणार आहे. येत्या काही दिवसात ही चर्चा होऊ शकते. 

लवकरच चर्चा करणार 
^महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याबाबत लवकरच चर्चा केली जाणार आहे. ही चर्चा केव्हाही होऊ शकते. तसेच एका बैठकीत चर्चा होऊन निर्णय होणार नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अद्याप वेळ अाहे. या दरम्यान आणखी काही बैठका होतील.’’ किशोर मांगटे पाटील, भाजप महानगराध्यक्ष 
 
भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांच्या मुलाखती पुढील आठवड्यात होतील, अशी माहिती सुत्रांनी दिली. युती होण्याची शक्यता असल्यास या मुलाखती पुढे ढकलल्या जाऊ शकतात. 

भाजपने विधानसभेनंतर नगरपालिका, आता जिल्हा परिषद महापालिका निवडणुक स्वबळावर लढवण्याची भाषा केली होती. मात्र आता थोडासा बदल भाजपने घेतला आहे. परंतु इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यास सर्वात आधी सुरवात करुन पक्षाने निवडणुकीचे बिगुल सर्वात आधी वाजवले होते. भाजप उमेदवारीसाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. ३२५ उमेदवारांनी दाखल केले असून यात १२० महिला, १५ अल्पसंख्यांकाचाही समावेश आहे. आता मुलाखतीबाबत इच्छुकांना उत्सुकता लागली आहे. उमेदवारीचा तिढा सुटला नाही तर प्रचारासाठी कमी दिवस मिळतात, असे इच्छुकांचे म्हणणे आहे. परंतु एकीकडे शिवसेनेसोबत युतीसाठी चर्चा, दुसरीकडे उमेदवारांच्या मुलाखती, असा दुहेरी पेच भाजपसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळेच युती झाली तर, युती नाही झाली तर अशी दोन्ही बाजुने पडताळणी करुनच मुलाखती पुढच्या आठवड्यात घेतल्या जातील, अशी माहिती भाजप सुत्रांनी दिली. दरम्यान भाजपने १५ अल्पसंख्याकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा दावा केला असला तरी भाजपकडे तगडे अल्पसंख्याक उमेदवार कमी आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्यांकाची मते निर्णायक असून २० ते २१ नगरसेवक या भागातून निवडुन येतात. त्यामुळे या सर्व ठिकाणी भाजपला उमेदवार मिळालेले नाही, ही बाब स्पष्ट होते. मात्र नगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर मनपा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला. मागच्या निवडणुकीतही भाजपने अल्पसंख्यांक समाजाला उमेदवारी दिली होती. यावेळी मात्र ही संख्या पाच अथवा त्यापेक्षा अधिक होऊ शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली.