आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभरामध्येच होणार मनपा निवडणुकीची घोषणा, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका निवडणूक अधिक पारदर्शी व्हावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी योग्य उमेदवाराची निवड करता यावी, यासाठी निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. यात यावेळी प्रथमच प्रत्येक उमेदवाराची माहिती फ्लेक्सच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावर लावली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारीया यांनी दिली. 

आठ जानेवारीला बुलडाणा जिल्हा परिषद अकोला महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ते अकोल्यात आले असता, जिल्हाधिकारी कार्यालयात निवडक पत्रकारांशी साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

सहारीया म्हणाले, नगरपालिकेच्या निवडणुकीत काही बदल केले. तेच बदल महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वापरले जाणार आहेत. परंतु, या निवडणुकीत आणखी महत्वपूर्ण बदल केले आहेत. यापूर्वी उमेदवाराच्या संपत्तीची माहिती संपूर्ण मतदारांना मिळत नव्हती. मात्र, यावेळी प्रत्येक उमेदवाराची चल, अचल संपत्तीची माहिती वृत्तपत्रात प्रकाशित केली जाणार आहे. त्याच बरोबर त्याचे शिक्षण किती? त्याच्या किती गुन्हे दाखल आहेत? यापैकी किती खटल्यांचा निकाल लागला आहे? किती प्रलंबित आहे? आदी सर्व माहितीही वृत्तपत्रात प्रकाशित केली जाणार आहे. केवळ वृत्तपत्रातच माहिती प्रकाशित केली जाणार नसून प्रत्येक मतदार केंद्रात संबंधित उमेदवाराच्या संपूर्ण माहितीचे फ्लेक्स लावले जातील. जेणेकरून मतदानाला आलेल्या मतदाराला मैदानात उतरलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती प्राप्त होऊन योग्य उमेदवाराची निवड करण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही ते म्हणाले. 

या निवडणुकीत संगणकीकरणाचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे. उमेदवाराला उमेदवारी अर्ज ऑनलाईन दाखल करावा लागेल. त्याची प्रिंट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे. यामुळे निवडणुकीत किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले, किती जणांनी माघार घेतली? कोणाकडे किती संपत्ती होती? आदी बाबतची संपूर्ण माहिती संकलित होऊन त्याचा डाटा तयार करण्यास मदत मिळणार आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकींची स्थानिक स्वराज्य संस्थेकडे फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु, संगणकीकरणामुळे हा फायदा मिळणार आहे. उमेदवाराला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत खर्च सादर करावा लागणार आहे. 
 
निवडून आलेले जे उमेदवार एक महिन्यात खर्च सादर करणार नाहीत, ते अपात्र होतील. त्याच बरोबर राजकीय पक्षांना दोन टप्प्यात खर्च सादर करावा लागणार आहे. निकालानंतर २० दिवसांंत उमेदवारांवर किती खर्च केला आणि उर्वरित ४० दिवसांत पक्षाने किती खर्च केला? याची माहिती सादर करावी लागणार आहे. जे राजकीय पक्ष माहिती सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई केली जाईल, अशी माहिती निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी दिली. 

१५ जानेवारीच्या आत निवडणुकीची घोषणा 
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा केव्हा? याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, १५ जानेवारीच्या आत निवडणुकीची घोषणा होईल. १५ जानेवारीला रविवार १४ जानेवारीला दुसरा शनिवार असल्याने १० ते १३ जानेवारीदरम्यान निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे येत्या आठवडाभरातच निवडणुकीच्या घोषणेची सूचना येऊ शकते.
 
‘व्हिजन’ चा निर्णय प्रलंबित 
उमेदवाराला प्रतिज्ञा पत्र सादर करताना काही ठराविक आठ ते दहा प्रश्न दिले जातील. प्रश्ने शहर, प्रभागाच्या विकासासंबंधी राहतील. जेणे करुन संबंधित उमेदवाराचे विकासाचे व्हिज नेमके काय आहे? याची माहिती प्राप्त होईल. अद्याप हा निर्णय घेतलेला नाही. तो विचाराधिन आहे. परंतु हा प्रयोग माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी विधानसभा निवडणुकीत राबवला, असेही ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...