आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांच्या संपावर अतिवृष्टी इशाऱ्याचे ढग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - थकित वेतनासह विविध मागण्यांसाठी सहा ऑगस्टपासून महापालिका कर्मचारी संघर्ष समितीने पुकारलेल्या कामबंद आंदोलनावर अतिवृष्टीच्या इशाऱ्याचे ढग घोंगावल्याने संप अनिश्चिततेत अडकला आहे. रात्री उशिरापर्यंत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या.
महापालिका कर्मचाऱ्यांनी थकित वेतन, भविष्य निर्वाह निधीची रक्कम, महागाई भत्ता, रजा रोखीकरण, पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम आदी विविध मागण्यांसाठी सहा ऑगस्टपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. तसा इशाराही निवेदनातून महापौर आणि प्रशासनाला दिला होता. यादरम्यान आयुक्त आणि कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्याही झाल्या. परंतु, चर्चेत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सहा ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय महापालिका कर्मचारी संघर्ष समितीने घेतला होता.

परंतु, दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठावरील वस्त्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे वेधशाळेने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अशा काळात कामबंद आंदोलन केल्यास नागरिक वेठीस धरल्या जातील. त्यामुळे तूर्तास संप मागे घ्यावा, अशी विनंती महापौर उज्ज्वला देशमुख यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केली होती. तसेच आयुक्त सोमनाथ शेटे मुंबईला असताना महापालिकेत वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसताना कामबंद आंदोलन करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही निर्माण झाला. त्यामुळे कामबंद आंदोलनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली.
संघटनेतील काही गटाचे म्हणणे होते की, कामबंद आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करावे तर काही गटाचा यास विरोध होता. त्यामुळे वृत्त लिहेपर्यंत संपाबाबत निश्चित निर्णय झाला नव्हता. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेच्या फेऱ्या मात्र सुरू होत्या. दरम्यान, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण सर्व परिस्थिती लक्षात घेता हे आंदोलन तूर्तास मागे घेतले जाईल, परंतु रद्द केले जाणार नाही.
बातम्या आणखी आहेत...