आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाई अतिक्रमण काढू शकते, तर सीईओंना "प्रॉब्लेम' काय...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेची महिला अधिकारी जी आयएएससुद्धा नाही, ती बुलडोझर घेऊन अतिक्रमण काढते. एक महिला अतिक्रमण काढण्याची हिंमत दाखवते. मात्र, जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण आहे, हे तूर्तास काढणे शक्य नाही, अशी दस्तुरखुद्द कबुली एक आयएएस अधिकारी असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी देतात. त्यांच्यात कारवाई करण्याची धमक नाही, तुमच्याने अतिक्रमण काढता येत नसेल तर आम्ही महिला काढून दाखवतो', असा आक्रमक पवित्रा जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभाताई शेळके यांनी घेतला. त्याला स्थायीच्या सदस्यांनी पाठिंबा दिला.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची आज, बुधवारी सभा झाली. त्यामध्ये त्या बोलत होत्या. स्थायी समितीची सभेची वेळ वाजताची होती. मात्र, ही सभा २.५० मिनिटांनी सुरू झाली. सभेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तापी, स्थायीचे सदस्य, विजय लव्हाळे, बांधकाम कार्यकारी अभियंता विजय कुंभारे, कृषी विकास अधिकारी हनुमंतराव ममदे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई शेळके, चंद्रशेखर पांडे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, अंबादास मानकर, समाजकल्याण अधिकारी माया केदार यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या मागच्या सर्वसाधारण सभेमध्ये टाऊन शाळेजवळील शिवाजी शाळेला दिलेल्या जागेवर एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत बेराेजगार युवकांसाठी प्रशिक्षण सभागृह बांधण्याचा ठराव घेण्यात आला होता. मात्र, ठराव झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जागेची पाहणी केली असता, त्यांना त्या जागेवर अतिक्रमण असल्याचे दिसून आले.

त्यामुळे त्यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याचे सोडून जिल्हा परिषद अध्यक्षांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी सध्यातरी ठराव झालेल्या जागेवर अतिक्रमण असल्यामुळे सभागृह बांधता येणार नाही. त्यामुळे ही जागा बदलून रामदासपेठेतील एकात्मिक विकास यंत्रणेच्या कार्यालयाजवळील जागेवर सभागृह बांधण्याची परवानगी द्यावी, असे लिहिले होते. या पत्रावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्य संतप्त झाले. सभेत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करता दुसरीच जागा सुचवणारे सीईओ कोण, असा प्रश्न शोभाताई शेळके यांनी केला.

त्यावर अध्यक्षांनीसुद्धा सदस्यांच्या भावनेचा आदर करत सभागृह ठराव झालेल्या जागेवर बांधू, अशी भूमिका घेतली. यावर बोलताना अध्यक्ष शरद गवई म्हणाले की, सीईओंनी दुरुस्त करून मला दुसरे पत्र लिहिले. त्यावर आयएएस दर्जाचा अधिकारी चुकतोय कसा, असा प्रश्न शेळके यांनी विचारला.

सीईअो उन्हाळेंच्या आदेशाची चौकशी करा
तत्कालीन सीईओ अरुण उन्हाळे यांनी गैरहजर राहणाऱ्या एका विस्तार शिक्षण महिला अधिकाऱ्यास पाठीशी घातले आणि तिची नियमबाह्यपणे बदली केली, असा आरोप सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी केला. त्यावर पुन्हा एकदा चौकशीची फाइल सीईओंकडे पाठवतो, असे शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले.

अबब...एका वर्षात काढल्या १० लाखांच्या झेरॉक्स
जिल्हापरिषदेत झेरॉक्स मशीनच नाही. त्यामुळे झेरॉक्स काढण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. याविषयी सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी विचारणा केली असता पाच विभागांचे झेरॉक्सचे बिल पाच लाखांच्यावर असल्याची माहिती देण्यात आली, तर निम्म्या विभागाची माहिती दिली नाही. जवळपास १० लाख रुपयांच्यावर झेरॉक्स बिल गेल्यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पांडे यांनी केला.

एका शाळेत चार अतिरिक्त, दुसऱ्या शाळेत शिक्षकच नाही
अकोला येथील टाऊन शाळेमध्ये ५० विद्यार्थ्यांसाठी चार शिक्षक अतिरिक्त आहेत. मात्र, सिरसोली येथील उर्दू शाळेत १५० विद्यार्थी असताना एकही शिक्षक नाही. माझ्या शाळेत शिक्षक द्या, अन्यथा भूमिका बदलावी लागेल, शिक्षण विभागात दोन पंडित आहेत, ते कुणाच्याही बापाचे ऐकत नाहीत, असा आरोप सदस्या शोभाताई शेळके यांनी केला. त्याला चंद्रशेखर पांडे यांनी समर्थन दिले.
जिल्हा परिषदेच्या सभेत बोलताना जिल्हा परिषद सदस्या शोभाताई शोळके.