आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतागृहासाठीचे अनुदान तांत्रिक चुकांमुळे परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका क्षेत्रांतर्गत स्वच्छतागृह बांधण्यासाठी राज्य शासनाकडून आलेल्या अनुदानातील पहिल्या टप्प्याचे ५०० लाभार्थ्यांना वाटलेल्या अनुदानापैकी जवळपास १४३ लाभार्थ्यांचे अनुदान तांत्रिक चुकांमुळे परत आले. प्रशासनाने परत आलेले अनुदान त्यांच्या खात्यात वळवण्यासाठी या चुकांची माहिती लाभार्थ्यांना दिली.

महापालिका क्षेत्रातील स्वच्छतागृहे नसलेल्या नागरिकांचा सर्व्हे जवळपास पूर्ण झाला आहे. जवळपास पाच हजार नागरिकांकडे टोपलीचे स्वच्छतागृह आहे, तर पाच हजार नागरिकांकडचा मल थेट नालीत सोडला जातो. त्यामुळे एकूण दहा हजार नागरिकांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनुदान द्यावे लागणार आहे. तूर्तास दोन कोटी २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु, ज्या नागरिकांकडे स्वत:ची जागा आहे, अशा नागरिकांनाच हे अनुदान दिले जाणार आहे.

तूर्तास निवड झालेल्या ५०० लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील सहा हजार रुपयांचे अनुदान प्रशासनाने त्यांच्या बँक खात्यात वळते केले. यापैकी जवळपास १४३ जणांचे अनुदान तांत्रिक कारणांमुळे परत आले. काही लाभार्थ्यांचे दोन ते तीन बँकेत खाते आहे. अनुदानासाठी एका बँकेचा खाते क्रमांक देऊन नाव दुसऱ्याच बँकेचे दिले, तर काही लाभार्थ्यांनी चक्क स्वत:चे नाव देऊन खाते क्रमांक लाभार्थी नसणाऱ्या व्यक्तीचे दिले. यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वळती झाली नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी संबंधित लाभार्थ्यांना या चुकांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहे. दुरुस्तीनंतर या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाचा पहिला टप्पा वळता होईल. ज्या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान दिले, त्या लाभार्थ्यांनी स्वच्छतागृहाचे काम सुरू केले असेल, त्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम वळती केली जाईल.

स्वच्छतागृह १२ हजारात कसे बांधावे?
१२ हजार रुपयात स्वच्छतागृहाचे बांधकाम करणे शक्य नसल्याने इतर महापालिकांनी यात पाच ते सहा हजार रुपयांचा हिस्सा वाढवून दिला. आयुक्त अजय लहाने यांनीही महापालिकेच्या वतीने हा हिस्सा मिळावा, असा प्रस्ताव महासभेकडे पाठवला होता. परंतु, महापौरांनी हा प्रस्ताव महासभेत घेतलाच नाही. त्यामुळे १२ हजार रुपयात स्वच्छतागृह कसे बांधावे? असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.