आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात महिन्यात केवळ साडेचार कोटी रुपयांची वसुली, कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या सात महिन्यात केवळ चार कोटी ३७ लाख रुपयांची मालमत्ता करवसुली केली आहे. या सात महिन्यांच्या वसुलीत कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे वेतनही प्रशासनाला देता येऊ शकले नाही. त्यामुळे मनपाला पुढील साडेचार महिन्यात २५ कोटी रुपये वसुलीचे आव्हान पूर्ण करावे लागणार आहे.

राज्य शासनाकडून महापालिकांना वेतनासाठी अनुदान दिले जात नाही. शिक्षकांच्या वेतनाच्या ५० टक्के अनुदान वगळता महापालिकेला कार्यरत कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन स्वत:च्या उत्पन्नातूनच करावे लागते. महापालिकेचे एलबीटी मालमत्ता करवसुली हे उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत आहेत. एलबीटी राज्य शासनाने बंद केला असला, तरी त्या मोबदल्यात महिन्याकाठी सव्वा चार कोटी रुपयाचे अनुदान दिले जाते. नगररचना, परवाना विभाग, बाजार विभाग यातून महापालिकेला फारसे उत्पन्न मिळत नाही, तर उत्पन्नाच्या इतर स्रोतांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच मालमत्ता कर १०० टक्के वसूल केल्याशिवाय महापालिकेला पर्याय नाही. मागील आर्थिक वर्षात महापालिकेने ३० कोटी रुपयांचा कर वसूल केला होता. त्यामुळे येत्या साडेचार महिन्यात १०० टक्के करवसुलीसाठी महापालिकेला कंबर कसावी लागणार आहे.

दरवर्षी डिसेंबर अथवा जानेवारीपासून करवसुलीस प्रारंभ केला जातो. त्या आधी सात ते आठ महिने करवसुलीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. जानेवारीपासून करवसुली सुरू झाली, तरी तीन महिन्यांच्या कालावधीत १०० टक्के वसुली होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडते तसेच इतर देणीही देता येत नाहीत.

सर्वाधिक कर वसुली झाली एप्रिल महिन्यात
चालू आर्थिक वर्षाच्या सात महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक करवसुली एप्रिलमध्ये ९८ लाख रुपयांची झाली. यात ९४ लाख रुपये थकित कराचे, तर तीन लाख ४० हजार रुपये चालू वर्षाच्या कराचे आहेत. यातही मार्चअखेर दिलेल्या धनादेशांमुळे या रकमेत वाढ झाली.

प्रत्यक्षात ५४ लाख रुपयांचाच कर वसूल
चालू आर्थिक वर्षाच्या सात महिन्यांत मनपाने चार कोटी ३७ लाखांचा कर वसूल केला, तरी यात तीन कोटी ८३ लाख रुपयांचा थकित कर वसूल केला, तर ५४ लाख हजार रुपये हा चालू वर्षाचा कर वसूल केला आहे. वसुली झाली नसती, तर अत्यल्प महसूल आला असता.

करवसुलीची भिस्त ६४ कर्मचाऱ्यांवर
तूर्तास ७३ हजार मालमत्तांकडून करवसुली केली जाते, तर नव्याने नोंद केलेल्या २४ हजार मालमत्तांची वसुली अद्याप सुरू झालेली नाही. करवसुलीसाठी ६४ कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्यावरच करवसुलीची भिस्त अवलंबून आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत प्रत्येक करवसुली लिपिकाला वसुलीचे टार्गेट दिले जाण्याची शक्यता आहे.