आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात आता स्टॅम्पची चोरी, विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवरील तिकिटे काढून विकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अनियमिततेसाठी प्रसिद्ध असलेल्या महापालिकेत आता नोंदणीच्या कागदपत्रांवर लावलेले स्टॅम्प (तिकीटे) काढून ती विकण्याचा गोरख धंदा सुरु झाला आहे. बुधवारी हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जन्म-मृत्यु दाखल्यासह विविध कागदपत्रांसाठी तसेच कराचा भरणा, पोषण आहाराचे वाटप आदी सर्वच प्रकरणात अनियमितता केल्याची प्रकरणे आता पर्यंत समोर आली आहे. यापैकी काही प्रकरणात अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही प्रकरणे विधी मंडळात गाजून अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणाही विधी मंडळातून झाली आहे. जन्म-मृत्यु विभागाने तर मुंबई येथील अमली पदार्थ तस्कारीत अटक झालेल्या आणि पॅरोलवर निघालेल्या कैद्याच्या मृत्युचे सर्टिफिकेटही देण्याचा पराक्रम केलेला आहे. त्यामुळे जेथे जमेल तेथे पैसे कसे मिळतील? याचा अभ्यास करण्यात काही कर्मचारी पारंगत झाले असल्याची बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

विवाह नोंदणी करताना संबंधित कागदपत्रांवर स्टॅप लावले जातात. नोंदणी झालेली तसेच नोंदणीची कार्यवाही सुरु असलेली कागदपत्रे रेकॉर्ड मध्ये ठेवली जातात. काही दिवसापूर्वी ठेवलेली विवाह नोंदणीची कागदपत्रे बुधवारी संबंधित अधिकाऱ्याने मागविल्या नंतर या कागदपत्रांवर लावलेल्या स्टॅपची चोरी झाली असल्याची बाब लक्षात आली. प्रत्येक तिकीटावर क्रॉस केले जात नाही. त्यामुळे ज्या तिकीटांवर क्रॉस केल्या गेले नाही, अशी तिकीटे वैध मानली जातात. त्यामुळे अशी तिकीटे विकताना कोणतीही अडचण येत नाही. बुधवारी उघडकीस आलेल्या या प्रकरणात ५०० ते ६०० रुपयांची तिकीटे चोरीस गेल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही कागदपत्रे ज्या रुम मध्ये ठेवली जातात. त्या रुमच्या कुलुपाच्या किल्ल्या दोन कर्मचाऱ्याजवळ आहेत. हे प्रकरण आयुक्त अजय लहाने यांच्यासमोर गेल्या नंतर त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांची चौकशी केली. दोघांनीही आपण ितकीटे काढली नसल्याची सांगीतले. परंतु किल्ल्या या दोन कर्मचाऱ्यांकडेच असल्याने ही तिकीटे नेमकी कोणी चोरली ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास उपायुक्त सुरेश सोळसे यांना देण्यात आला आहे. गुरुवारी या प्रकरणात कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...