आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेमध्ये अाता "अरे भय्या, आॅल इज वेल'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या जुलैला झालेल्या बैठकीत महापौरांसह काही नगरसेवक, नेत्यांची कानउघाडणी होईल, अशी शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, या बैठकीत रखडलेल्या विकास कामांबद्दल, स्थगित सभेबाबत कोणालाही धारेवर धरण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे भाजपच्या कोअर कमिटीला महापालिकेत सर्व काही आल इज वेल आहे, असे तर म्हणायचे नाही ना? अशी चर्चा भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवकांमध्ये सुरू आहे.

महापालिकेत विकासकामांपेक्षा गटबाजीला अधिक महत्त्व दिले जात आहे, तर दुसरीकडे स्थानिक नेत्यांमध्येच गट-तट निर्माण झाल्याने महापालिकेतील गटबाजीला आळा कोण घालणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच निधी उपलब्ध असताना विविध विकासकामे रखडली आहेत. सहा रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम, तर केवळ महासभा होत नसल्यामुळे रखडले आहे.
२७ मे रोजी स्थगित केलेली सभा अद्यापही बोलावण्यात आली नाही. केवळ एकमेकांना शह-काटशह देण्याच्या नादात अकोलेकर वेठीस धरले जात आहेत. याबाबत पक्षाचे स्थानिक नेते काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळेच जुलैला झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत या विषयांवर चर्चा होऊन पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्या जाते का? याबाबत नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली होती. जुलैला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणजित सावरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विकासकामांबाबत चर्चा झाली. काही प्रमाणात नाराजीही व्यक्त केली. मात्र, सुरू असलेल्या प्रकाराबाबत मात्र, कोणत्याही पदाधिकाऱ्याची कानउघाडणी समितीने केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. विकासकामेही रखडलेली नाहीत, सर्व काही आलबेल आहे? असे कोअर समितीला म्हणायचे आहे का? अशी चर्चा नगरसेवक आणि कार्यकर्ते करत असून, "अरे! भय्या, आॅल इज वेल', असे टोमणेही एकमेकांना मारत आहेत.

कोअर समितीचे अस्तित्व संपले
मनपातील कामकाज सुरळीत चालण्यासाठी कोअर समिती गठीत केली होती. या कोअर समितीत ज्या लोकप्रतिनिधी तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या समावेश आहे. परंतु स्थानिक नेत्यांमध्येही गटा-तट पडले आहेत. त्यामुळेच समितीची बैठक होण्यासही विलंब होत होता. ही समिती असुन नसुन सारखीच ठरली होती. त्यामुळे या समितीच्या ऐवजी नगरसेवकांची समिती गठीत केली. त्यामुळे आता कोअर समितीचे अस्तित्व संपुष्टात आले का? अशी चर्चा सुरु आहे.