आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटेपूर्णावरील मनपाची मक्तेदारी आली संपुष्टात, मनपाला मिळणार फक्त पाच दलघमी पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काटेपूर्णा प्रकल्पातून ५३ खेडी पाणीपुरवठा योजनेला दीड दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे काटेपूर्णा प्रकल्पात मुबलक जलसाठा आहे. प्रकल्पातील पाणी केवळ महापालिकेसाठीच राखीव आहे, असा दावा करून काटेपूर्णा प्रकल्पावर जणू काही आपलीच मक्तेदारी आहे, असा अधिकाऱ्यांनी करून घेतलेला गैरसमज यामुळे दूर झाला आहे, तर महापालिकेसाठी आता केवळ पाच दशलक्ष घनमीटर पाणी राहिले आहे. परिणामी, पावसाने दांडी मारल्यास शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील वर्षी सरासरी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात ५० टक्के जलसाठाही उपलब्ध झाला नाही. त्यामुळेच काटेपूर्णा प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, तर उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. काटेपूर्णा प्रकल्पावरून ५३ खेडी पाणीपुरवठा योजना, चार गाव पाणीपुरवठा योजना, मूर्तिजापूर पाणीपुरवठा योजना आदी विविध योजनांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, आरक्षित
केलेलेपाणी केवळ महापालिकेचेच आहे, असा गैरसमज करून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी कोणतीही ओरड नसताना सहा दिवसांआड सुरू असलेला पाणीपुरवठा तीन ते चार दिवसांआड आणला. या वेळी दिव्य मराठीने भविष्यातील पाणीटंचाईचा सामना कसा कराल, याबाबत वृत्त प्रकाशित करून या समस्येकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. परंतु, प्रकल्पात मुबलक जलसाठा आहे, असा दावा करून पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची दिशाभूल केली. परंतु, काही भागाला तीन आणि काही भागाला चार दिवसांआड सुरू केलेला पाणीपुरवठा काही दिवसानंतर संपूर्ण शहराला चार दिवसांआड करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला.
दरम्यान, उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने बाष्पीभवनातही वाढ झाली आहे. एकीकडे बाष्पीभवन आणि दुसरीकडे पाण्याची उचल यामुळे आता महापालिकेला पाच दशलक्ष घनमीटर पाण्यावरच जून अखेरपर्यंत अवलंबून राहावे लागणार आहे. जून अखेरपर्यंत अथवा त्यापुढे पावसाने दांडी मारल्यास शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे तूर्तास दीड दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश आहेत, यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फक्त दीड दलघमी पाणी पोहोचू शकते
"काटेपूर्णा'तून ५३ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी सोडल्यानंतर १७ किलोमीटरचा प्रवास करून हे पाणी खांबोरा येथे अडवले जाईल. दरम्यान नदीपात्रात दोनद, राहित असे दोन मोठे डोह लागतात. नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये पाणी साचेल, त्यानंतर पाणी खांबोरा येथे पोहोचेल. त्यामुळे प्रकल्पातून दीड दलघमी पाणी सोडले तरी प्रत्यक्ष खांबोरा केटीवेअरपर्यंत किती पाणी पोहोचणार ? त्यामुळे आणखी पाणी सोडावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
------------------------------