आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची तब्बल १४४० कोटी लीटरची पाणपोई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकापाणी पुरवठा विभागाच्या वतीने नागरिकांना दररोज पाणीपुरवठा होत नसला तरी वर्षाकाठी १२० कोटी लीटर पाणी, एक प्रकारे पाणपाेईच्या माध्यमातूनच नागरिकांना दिले जात आहे. ही बाब नळजोडण्यांची नोंद आणि पाण्याची केलेली उचल यातून सिद्ध झाली आहे. मनपाच्या दप्तरी नोंद असलेल्या ३४ हजार ८९७ नळजोडण्यांसाठी दरराेज केवळ पावणे दोन कोटी लीटर पाणी उचलण्याची गरज असताना प्रत्यक्षात पावणे सहा कोटी लीटर पाण्याची उचल केली जात आहे.
काटेपूर्णा प्रकल्पातून शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. प्रकल्पात महापालिकेसाठी २४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. प्रकल्पातील जलसाठा, वितरण व्यवस्था लक्षात घेऊन दरडोई पाणीपुरवठा निश्चित केला जातो. तूर्तास दरडोई, दररोज १०० लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या दप्तरी घरगुती आणि व्यावसायिक मिळून ३४ हजार ८९७ नळजोडण्यांची नोंद आहे. एका कुटुंबात पाच व्यक्ती गृहीत धरल्यास अधिकृतपणे एक लाख ७४ हजार ४८५ नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. दिल्या जाणाऱ्या दरडोई १०० लीटर पाण्यानुसार दररोज एक कोटी ७४ लाख ४८ हजार ५०० लीटर पाण्याची उचल करणे गरजेचे आहे. परंतु, प्रत्यक्षात पाच कोटी ७३ लाख लीटर पाण्याची उचल दररोज केली जाते. तूर्तास काही भागाला तीन तर काही भागाला चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, एकाच दिवशी तीन अथवा चार दिवसांचा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नळजोडण्यांची संख्या आणि होणारी पाण्याची उचल यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामुळे दररोज तीन कोटी ९५ लाख या हिशोबाने वर्षाकाठी १२० कोटी लीटर (१.२ दलघमी) पाणी नागरिकांना मोफत दिले जाते. हा सर्व प्रकार अवैध नळजोडण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने वर्षाकाठी १२० कोटी लीटरची पाणपोई सुरू केली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मोफत पाणी केवळ पाणपोईच्या माध्यमातूनच दिले जाते. या सर्व प्रकारामुळे महापालिकेला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तूर्तास दरडोई, दररोज १०० लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या दप्तरी घरगुती आणि व्यावसायिक मिळून ३४ हजार ८९७ नळजोडण्यांची नोंद आहे. अवैध नळजाेडण्या वैध करण्याची गरज अाहे.
दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे
पावणे अकरा कोटी खर्चून २१ दलघमी

नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षाकाठी एकूण ११ कोटी ७५ लाख रुपये खर्च करावे लागतात. यात पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी, कर्मचाऱ्यांचे वेतन, दुरुस्तीचा खर्च, शुद्धीकरण, विद्युत देयक आदी सर्वांचा समावेश आहे. या अनुषंगाने विचार केल्यास एक दलघमीसाठी महापालिकेला ५१ लाख रुपये खर्च करावे लागतात. या तुलनेने पाणीपट्टीची वसुली नगण्य आहे.

मोहिमांची नोंद कुठे?
अवैध नळजोडण्या वैध करण्याची मोहीम अनेक वेळा राबवली. परंतु, या नळजोडण्यांची नोंद दप्तरावर घेतल्या गेली नाही. नळजोडण्या वैध करताना मिळणारा महसूल कोणत्या खात्यात जमा केला, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. तर, अवैध नळजोडणी पथक गठित केले आहे. हे पथक पाहणी करत आहे.
१६ वर्षांत आठ हजार जोडण्यांची नोंद
महापालिका अस्तित्वात आली त्या वेळी नळजोडण्यांची संख्या २६ हजार ८१० होती. आता ही संख्या ३४ हजार ८९७ झाली आहे. त्यामुळे १६ वर्षांत केवळ आठ हजार ८७ नळजोडण्या वाढल्या आहेत, तर मालमत्तांची संख्या ९७ हजारांपेक्षा अधिक आहे. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल ते फेब्रुवारी) केवळ २५५ नळजोडण्यांची नोंद झाली.