आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका शाळेच्या मदतीला प्रभात किड्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकाशाळा क्रमांक २६ मधील दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या मदतीला शहरातील नावाजलेली प्रभात किड्स धावून येणार आहे. प्रभातमधील विविध विषयांमधील तज्ज्ञ या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान वाचणार आहे.

एकीकडे महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या असताना, त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असताना महापालिका शाळा क्रमांक २६ मात्र दिमाखदारपणे उभी आहे. एवढेच नव्हे, तर या शाळेत ५८० विद्यार्थी शिक्षण घेतात. नगरसेवकांनी मनात आणले तर ते महापालिकेच्या शाळा वाचवू शकतात. याचा प्रत्यय नगरसेवक दिलीप देशमुख यांनी आणून दिला आहे. शिक्षकांसाठी तसेच शाळेच्या सुविधेसाठी सातत्याने प्रशासनाशी भांडणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळेच महापालिका शाळा क्रमांक २६ मध्ये केजी-१, सेमी इंग्रजी वर्गही सुरू करण्यात आले आहेत. दिलीप देशमुख यांच्या महत्प्रयासानेच या शाळेत दहाव्या वर्गाच्या तुकडीलाही मान्यता मिळाली आहे. केजी-१ ते दहावी अशी शिक्षणाची व्यवस्था असलेली ही महापालिकेची पहिलीच शाळा ठरली आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा पुरवल्या जातात. स्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून ते डेस्क बेंच, संगणक प्रशिक्षणासह गार्डनची सुविधाही या शाळेत उपलब्ध आहे.

परंतु, दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मात्र शिक्षकांची संख्या कमी आहे. इतर शाळांप्रमाणे या शाळेतही इयत्ता आठवी, नववी दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांचे तास (पिरेड) होतात. परंतु, पाचवी ते सातवी या वर्गाला शिकवणारे शिक्षकच आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. शिक्षक जीव तोडून तसेच प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना बीजगणित, भूमिती आणि विज्ञान या विषयांच्या संपूर्ण मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याने त्यांचे पालक त्यांना खासगी शिकवणी वर्गही लावून देऊ शकत नाहीत. महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी इतर महापालिका शाळांसमोर आदर्श ठरलेल्या या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक पुरवण्यासंदर्भात फारसा पुढाकार घेतला नाही. त्यामुळे दहावीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या अनुषंगाने "दिव्य मराठी'ने ऑगस्टच्या अंकात ‘शिक्षणातील नंदनवन ठरलेल्या शाळेचे होतेय वाळवंट’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून सामाजिक संघटनांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रभात किड्सने प्रतिसाद दिला. प्रभात किड्सचे विविध विषयांतील तज्ज्ञ महापालिका शाळा क्रमांक २६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

महापालिका शाळा क्रमांक २६ मधील दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना सोई-सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मात्र, आता त्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणार आहे.

चांगले शिक्षण मिळावे
माझाभागात जवळपास सर्वच रोजगार करणारा वर्ग राहतो. त्यांच्या पाल्यांना किमान दहावीपर्यंत चांगले शिक्षण मिळावे, अशी माझी इच्छा आहे. यासाठी मी प्रयत्नशील असतो. "दिव्य मराठी'ने शाळेला वारंवार पाठबळ दिले आहे. प्रभात किड्स मदतीला धावून येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निकाली निघेल. मी दिव्य मराठी प्रभात किड्सचा सदैव ऋणी राहीन.'' दिलीपदेशमुख, नगरसेवक मनपा, अकोला

सर्वतोपरी मदत करू
महापालिकाशाळा क्रमांक २६ मधील दहावीच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण व्हावेत, यासाठी आमच्या शाळेतील तज्ज्ञ या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करून त्यांच्या विषयासंबंधीच्या अडचणी सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. मी स्वत:ही सोमवारी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.'' डॉ.गजानन नारे, संचालक प्रभात किड्स