आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा शाळेसाठी ‘मिशन २६’, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रभात किड्सचा अॅक्शन प्लॅन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनपाशाळा क्रमांक २६ मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ते चांगले गुण घेऊन दहावीची परीक्षा उत्तीर्ण व्हावे, यासाठी प्रभात किड्स या शाळेसाठी ‘मिशन २६’ योजना वर्षभर राबवणार असल्याचे अभिवचन प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी विद्यार्थ्यांना दिले.
महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. नगरसेवक दिलीप देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या शाळेला इयत्ता नववी दहावीच्या तुकडीची मान्यता मिळाली आहे. परंतु, दुर्दैवाने आठवी, नववी दहावीतील विद्यार्थ्यांना इतर शाळांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करता यावी, यासाठी महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

गणित, विद्यान या विषयांसह इतर विषयांच्या शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी लटकले आहे. या विद्यार्थ्यांना इतर शैक्षणिक संस्था सामाजिक संघटनांची मदत मिळावी, असे आवाहन दैनिक दिव्य मराठीने केले होते. या आवाहनाला प्रभात किड्सने त्वरित प्रतिसाद दिला. केवळ प्रतिसादच दिला नाही, तर १० ऑगस्टला डॉ. गजानन नारे, प्रदीप अवचार यांनी शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.

डॉ. गजानन नारे पुढे म्हणाले, नगरसेवकांनी मनावर घेतले तर महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावू शकतो, ही बाब दिलीप देशमुख यांनी सिद्ध केली आहे. त्याच बरोबर शिक्षकांनीही पुढाकार घेतल्याने या शाळेचा विद्यार्थीसंख्येचा तसेच शैक्षणिक दर्जाचा आलेख सतत उंचावणारा राहिला आहे. त्यामुळे हा आलेख घसरू नये, यासाठी प्रभात किड्स तुम्हा विद्यार्थ्यांना सर्वप्रकारे मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर आहे. दहावीतील सर्वच विद्यार्थ्यांना चांगले गुण कसे मिळतील? अभ्यास कसा करावा? आदींबाबत प्रभात किड्स मार्गदर्शन करेल, अशी ग्वाहीही दिली.

या वेळी प्रदीप अवचार यांनी भर उन्हात बसलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना हसतमुख केले. ते म्हणाले, रविवार तसेच ज्या दिवशी सुटी असेल त्या दिवशी विद्यार्थ्यांशी संवाद तर साधलाच जाईल, परंतु मार्गदर्शनही केले जाईल.

चेहऱ्यावर हास्य | शाळेतशिक्षकांचा अभाव असताना ४३ विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा द्यावी लागणार होती. परंतु, प्रभात किड्सच्या मिशन २६ मुळे आपल्यालाही खासगी शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण मिळेल, या भावनेने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

प्रत्यक्ष अनुभव मिळणार | विद्यार्थ्यांनाप्रभात किड्सच्या स्कूल बसमधून प्रत्यक्ष प्रभात किड्समधील शिक्षणाचा, लायब्ररीचा, लेबाॅरेटरीचा अनुभव घेता येणार आहे. तशी व्यवस्था प्रभात किड्सतर्फे दिली जाणार आहे. या मिशनला १७ ऑगस्टपासून प्रारंभ होईल.

गजानन गवई यांचा मोठेपणा | भारिप-बमसंचेगटनेते गजानन गवई यांनी प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांचे अभिनंदन करण्यासाठी हजेरी लावली. या वेळी गवई यांनी डॉ. नारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. मनपा शाळांना प्रभात किड्ससारख्या संस्थांची गरज अाहे. डॉ. नारे यांच्यासारखाच इतरांनी मनपा शाळांसाठी पुढाकार घेतल्यास दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन सुसह्य होईल, अशी भावना व्यक्त करून, दिव्य मराठीचेही त्यांनी अभिनंदन केले.

प्रभात, दिव्य मराठीवर शुभेच्छांचा वर्षाव
दिव्यमराठीने वृत्त प्रकाशित करून केलेल्या आवाहनाला प्रभात किड्सने प्रतिसाद देऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याबद्दल नगरसेवक दिलीप देशमुख, गटनेते गजानन गवई यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका, पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रभात किड्स आणि दिव्य मराठीला शुभेच्छा देऊन धन्यवादासह आभार व्यक्त केले.