आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता ४० हजार, नळजोडण्या चार हजार, हातपंपांची संख्या ३३८

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांमध्ये एकूण ४० हजार ३८६ मालमत्तांची नोंंद आहे, तर सहा गावांत एकूण वैध नळधारकांची संख्या चार हजार १२९, तर ३३८ सार्वजनिक हातपंप आहेत. हजारो नागरिकांनी मालमत्तेची नोंद केली नसल्याने या मालमत्तांमध्ये २५ हजारांपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी महापालिका क्षेत्रातील मालमत्तांची संख्या पावणेदोन लाखापेक्षा अधिक असू शकते, असा अंदाज महापालिकेने व्यक्त केला आहे. यातून महापालिकेच्या मालमत्ता करात कोट्यवधी रुपयांनी वाढ होणार आहे.
महापालिकेच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी झाल्यानंतर २४ ग्रामपंचायतींमधील विविध रेकॉर्ड ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. ग्रामपंचायतीतील कर्मचारी, ग्रामपंचायतीने “बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्त्वावर बांधलेले व्यापारी गाळे, कोंडवाडे, मालमत्ता, नळजोडण्या, मोकळी मैदाने, घराचे नकाशे आदी विविध विभागांचे रेकॉर्ड घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मालमत्ता कर विभागाने मालमत्तेसंदर्भातील रेकॉर्ड ताब्यात घेतले आहे. २४ ग्रामपंचायतींमध्ये कराचा भरणा करणाऱ्या एकूण ४० हजार ३८६ मालमत्ता आहेत. अद्यापही हजारो मालमत्ताधारकांनी संबंधित ग्रामपंचायतीत मालमत्तेची नोंद केली नाही. तसेच केवळ सहा गावांत पाणीपुरवठा योजना असल्याने या सहा गावांत वैध नळजोडणीधारकांची संख्या केवळ चार हजार १२९ असून, सार्वजनिक हातपंपांची संख्या ३३८ आहे.

समाविष्ट झालेल्या २४ पैकी शिलोडा, उमरी, शिवर, शिवणी,मलकापूर, खडकी या गावांमध्ये जवळपास चांदूर येथील विहिरीवरून तसेच काही गावांमध्ये बोअरने पाणीपुरवठा होतो. या सहा गावांत पाणीपुरवठा केवळ सुरळीत करण्याचे काम महापालिकेला करावे लागेल. उर्वरित गावांत पाणीपुरवठा पोहोचवण्याचे जिकरीचे काम करावे लागेल.

नोंद नसलेल्या मालमत्तांना फटका
हद्दवाढीनंतर नियमानुसार दोन वर्षे ज्या मालमत्तांची नोंद ग्रामपंचायतीत आहे, अशा मालमत्ताधारकांना हद्दवाढीपासून दोन वर्षे ग्रामपंचायतीने आकारलेल्या कराचा भरणा करता येईल. परंतु शहरासह २४ गावांतील ज्या मालमत्तांची नोंद नाही, अशा मालमत्ताधारकांना मनपा अधिनियमानुसार किमान सहा वर्षांच्या मालमत्ता कराचा भरणा करावा लागणार आहे.

पाणीपुरवठा योजना ताब्यात
ज्या ग्रामपंचायतींकडे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत, त्या महापालिकेने ताब्यात घेतल्या असून संबंधित ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांनाही या योजना चालवण्याचे काम देण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने ब्लिचिंग पावडर पुरवण्याचे कामही महापालिकेकडून सुरू आहे.

मालमत्ता करात कोट्यवधीने वाढ
महापालिकेला तूर्तास मालमत्ता करातून (पाणीपट्टी वगळता) १६ कोटी रुपये मिळतात. महापालिका क्षेत्रातील २५ हजार आणि २४ गावांतील नोंद असलेल्या ४० हजार मालमत्ता आणि सर्वेक्षणानंतर वाढणाऱ्या मालमत्ता लक्षात घेता, महापालिकेला मालमत्ता करातून किमान ४५ ते ५० कोटी रुपये महसूल मिळणे अपेक्षित आहे.

मालमत्तेच्या संख्येत वाढ
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या दप्तरी ७४ हजार मालमत्तांची नोंद आहे. या ७४ हजार मालमत्ताधारकांकडून करवसुली होते. मागील वर्षी महापालिका कर्मचाऱ्यांनी मालमत्तांची नोंदणी केल्यानंतर ही संख्या ९६ हजारांवर पोहोचली होती. आता यात २४ गावांतील ४० हजार मालमत्ता वाढल्या असून, शहरासह या २४ गावांमधील मालमत्तांचा सर्वेक्षण झाल्यानंतर मालमत्तांचा आकडा एक लाख ७५ हजारांच्या वर जाण्याची अपेक्षा महापालिकेतील अधिकाऱ्यांना आहे. याचबरोबर नळ योजना असलेल्या सहा गावांतील नळधारकांच्या संख्येतही वाढ अपेक्षित आहे.
बातम्या आणखी आहेत...