आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची सभा पुन्हा पुढे ढकलली, अायुक्त लहानेंची अनुपस्थिती की सत्ताधाऱ्यांनी घेतली माघार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून पदाधिकाऱ्यांचा कक्ष कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळेच पदाधिकाऱ्यांचे कक्ष निश्चित करण्याचा प्रस्ताव महासभेत घेण्यात आला. बुधवारी होणाऱ्या सभेत विषयाला वरकरणी बगल देत पंतप्रधान आवास योजनेची ढाल करून ही सभा गाजण्याची चिन्हे निर्माण झाली असताना सत्ताधारी गटाने मंगळवारी रात्री उशिरा आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे ही सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नगरसेवकांना कळवली. त्यामुळे सभा पुढे ढकलण्यामागे आयुक्तांची अनुपस्थिती की सत्ताधाऱ्यांची माघार, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

महापालिका अस्तित्वात आल्यानंतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांसाठी कक्ष निश्चित करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर झालेला नाही, तर दुसरीकडे कक्षावरून गेल्या १६ वर्षांत वादही निर्माण झाला नाही. परंतु, मागील तीन वर्षांपासून स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने स्थायी समिती सभापतींच्या कक्षात विरोधी पक्षनेत्यांनी कार्यालय सुरू केले. स्थायी समिती अस्तित्वात आल्यानंतर सभापती विजय अग्रवाल यांनी कक्षाची मागणी केली. परंतु, विरोधी पक्षनेता साजिदखान यांनी महासभेने पदाधिकाऱ्यांच्या कक्षाचा प्रस्ताव मंजूर केलेला नाही, अशी सबब पुढे करून कक्ष सोडण्यास नकार दिला. महासभेने प्रस्ताव मंजूर केला नसल्याने प्रशासनानेही हतबलता व्यक्त केली. या सर्व प्रकारामुळे कक्ष सोडण्याचा आणि कक्ष घेण्याचा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेचा बनवला. सत्ताधारी गटाने पदाधिकाऱ्यांचा कक्ष निश्चितीचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी होऊ घातलेल्या सभेच्या विषयपत्रिकेत या विषयाचा समावेश करण्यात आला. यामुळे विरोधक चांगलेच संतप्त झाले होते. सोमवारी झालेल्या सभेतच विरोधी गटाने बुधवारच्या सभेसाठी तयारी ठेवा असे खुले आव्हान दिले होते.

महासभेने असा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर प्रशासनाला या मंजूर प्रस्तावाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. विरोधक पदाधिकाऱ्यांच्या कक्षाचे कारण पुढे करून वाद उपस्थित करू शकत नसल्याने पंतप्रधान आवास योजनेत केवळ १६०० घरकुलांचे प्रस्ताव कसे काय मंजूर केले, हा मुद्दा समोर करून महासभेत सत्ताधारी गटाला धारेवर धरण्याचा बेत विरोधकांनी आखला होता. विरोधकांनी सत्ताधारी तसेच प्रशासनाला घेरण्याची जोरदार तयारी केली होती. परंतु सत्ताधारी गटाने आयुक्त अमरावती दौऱ्यावर जात असल्याचे कारण पुढे करून ही सभा पुढे ढकलल्याचे मंगळवारी रात्री एका पत्रकातून जाहीर केले. यामुळे विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.

नेमके कारण काय?
बुधवारीसभा घेण्याचा निर्णय झाल्यानंतर आयुक्त अजय लहाने यांनी ते अमरावती दौऱ्यावर जात आहेत, याची कल्पना सत्ताधारी गटाला दिली होती. तरीही या सभेचे आयोजन करण्यात आले आणि सभेला काही तास राहिले असताना सभा पुढे ढकलल्याचे सत्ताधारी गटाने पत्रकातून जाहीर केले. त्यामुळे सभा पुढे ढकलण्यामागे नेमके कारण काय? याबाबत नगरसेवकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

पुन्हा पायमल्ली
स्वत:लाशिस्तप्रिय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून संबोधणाऱ्या भाजपच्या सत्ताकाळात सभा पुढे ढकलताना वारंवार महापालिका अधिनियमांची पायमल्ली केली जात आहे. भाजपने सत्ता ताब्यात घेतल्यापासून दीड वर्षाच्या काळात चुकीच्या पद्धतीने तिसऱ्यांदा सभा पुढे ढकलली.