आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्तात अंत्यसंस्कार, शहरामध्ये तणाव कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - गुलजारपुऱ्यात शुक्रवारी रात्री दोन युवकांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. या घटनेमुळे शनिवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा तणाव होता. हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीवरून येथील नागरिकांनी श्रीवास्तव चौकात भिरड पेट्रोलपंपाजवळ रास्ता रोको केला होता, तर काहींनी दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. शनिवारी दिवसभर आणि रात्री शहरात तणावाचे वातावरण होते.

एका धार्मिक स्थळाशेजारी गाणे आणि कव्वालीचा जोरजोरात आवाज येत होता. म्हणून मनोज शांताराम धुमाणे याने विभिन्न समुदायातील काही व्यक्तींना आवाजासंदर्भात हटकले. त्यावरून त्याच्यात आणि मनोजमध्ये वाद झाला होता. मात्र, हा वाद काही वेळाने सामोपचाराने मिटवण्यात आला. त्यानंतर वाद घालणारे निघून गेले. मात्र, यापूर्वीचा प्रेम प्रकरणाचा दुसरा वादसुद्धा भांडणाला पूरक ठरला. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास एका समुदायातील सात जण हातात तलवार आणि पाइप घेऊन दुचाकीवरून मनोजचा शोध घेऊ लागले. एवढ्यात मनोज आणि त्याचा मित्र जय वाडेकर हे दोघे गडंकी रोडवरील नागेबंधू आणि श्री जनरल स्टोअर्ससमोर उभे असलेले दिसले. या हल्लेखोरांनी मनोजवर सपासप तलवारीने वार केले. त्याला मदत करण्यासाठी धावणारा त्याचा मित्र जय याच्यावरसुद्धा त्यांनी लोखंडी पाइप आणि तलवारीने हल्ला चढवला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. दोन समूहातील वाद असल्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून तगडापोलिस बंदोबस्त लावला आणि संपूर्ण शहर बंद केले. शुक्रवारी रात्री गुलजारपुऱ्याला छावणीचे स्वरूप आले होते. या वेळी क्यूआरटी, आरसीपी आणि राखीव दलांच्या कुमक तैनात केल्या होत्या. शनिवारी सकाळी मनोजच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाल्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास रुग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह घेऊन जाताना गुलजारपुऱ्यातील जमावाने श्रीवास्तव चौकातील भिरड पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावर रुग्णवाहिका अडवत रास्ता रोको करून हल्लेखोरांना अटक करण्याच्या घाेषणा दिल्या.

या वेळी पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, उलट दुसऱ्या भागातून दगडफेक करण्यात आली. या वेळी जमावाला शांत करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात लाठीचार्ज करण्यात आला आणि पुन्हा या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली.
गुलजारपुरा येथे संतप्त महिलांचे सांत्वन करताना जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा.

चौकीची मागणी
मनोजधुमाणे यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास निघाली. या वेळी महिलांनी पोलिसांवर रोष व्यक्त करत गुलजारपुऱ्यात पोलिस चौकीची मागणी केली. त्यावर या भागात पोलिस चौकी देण्याचे आश्वासन पोलिसांच्या वतीने दिले.

दुसऱ्या दिवशीही अफवांचा ऊत
शनिवारीदिवसभर शहरात अफवाना ऊत आला होता. जुने शहरात दंगल झाली, दगडफेक झाली आणि संचारबंदी लावण्यात आल्याची अफवा पसरली होती. मात्र, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे शहरात कुठेही अनुचित घटना घडली नाही. संपूर्ण शहरात पेट्रोलिंग, वाहन तपासणी केली. तसेच अफवांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी केले आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री पाेलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवला होता. शनिवारी रात्री १० वाजताच शहरातील दुकाने बंद केली होती.

तुकडी दाखल
शहराततणावाचे वातावरण झाल्यामुळे शनिवारी सकाळी शहरात अमरावतीहून एसआरपीची एक प्लाटून दाखल झाली. जुने शहरातील संवेदनशील भागात आणि गुलजारपुऱ्यात कडक बंदोबस्तामुळे येथे संचारबंदीचे स्वरूप आले होते.

डाबकी रोड पोलिसांत तक्रार
मृतकमनोज शांताराम धुमाणे याचा भाऊ विजय शांताराम धुमाणे यांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, मनोज आणि त्याचा मित्र जय वाडेकर हे चौकात उभे होते. अचानक रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मनोजवर दुचाकीवरून हातात तलवारी आणि लोखंडी पाइप घेऊन आलेल्या जावेद, मेहबूब, अकील, बबलू आणि त्यांच्या तीन साथीदारांनी वार केले. याप्रकरणी पोलिसांनी सातही जणांविरुद्ध भादंवि ३०२, ३०७, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४, २५, १३५ बी. पी. अॅक्टनुसार गुन्हे दाखल केले.
बातम्या आणखी आहेत...