आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळवडीनिमित्त शहरात उद्या होणार ‘मूर्ख संमेलन’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला शहराने जी काही वैशिष्ट्ये जपली आहेत त्यामध्ये धुळवडीच्या दिवशी होणारे मूर्ख संमेलन आहे. गेली ४५ वर्षे हा सांस्कृतिक जलसा साजरा करण्यात येत आहे. मूर्ख संमेलनाची सुवर्ण जयंतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अकोल्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने ही परंपरा पुढे नेण्यात येत आहे. ‘थोडासा रुमानी हो जाये’ असा माहोल त्यात असतो. सोमवारी १३ मार्चला हे मूर्ख संमेलन होणार आहे. 
 
उत्तर भारतात धुळवडीला मूर्ख संमेलन साजरे होत असे. त्यातून प्रेरणा घेऊन ज्येष्ठ पत्रकार रामकिशोर श्रीवास आणि सहकाऱ्यांनी १९७२ मध्ये कॉटन मार्केट परिसरात मूर्ख संमेलनाची मुहुर्तमेढ रोवली. त्यावेळी शहरातील विधिज्ञ, पत्रकार, साहित्यिक, कवी, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते सर्वांचाच सहभाग राहत असे. कॉटन मार्केट सामाजिक, आर्थिक चळवळीचे केंद्र होते. आजच्यासारखी माध्यमे तेव्हा नव्हती. मूर्ख संमेलनात ‘मुखवटा’ धारण करता सर्वजण निखळ आनंद लुटण्यासाठी सहभागी होत असतं. 
 
‘अभिनव विधानसभा’ ही तर अनुभवण्याची बाब होती. आगळ्यावेगळ्या पद्धतीने विधानसभेचे कामकाज चालायचे आणि शेवटी दगड मारण्यात येऊन विधानसभा भंग केली जायची. या मध्ये शहराच्या विविध भागातून अगदी मिरवणुकीने लवाजम्यासह मान्यवर सहभागी होत. त्यानंतर संमेलन मानेक टॉकिजजवळ होऊ लागले. काही वर्ष तेथे झाल्यानंतर स्वराज्य भवनच्या प्रांगणात, खुले नाट्यगृहात संमेलन होऊ लागले. कै. डॉ. प्रभुदयाल शर्मा कित्येक वर्ष मूर्खाधिराज होते. त्यांच्यानंतर हे पद त्यांचा मुलगा विकासचंद्र शर्मा भूषवित आहेत. सिटी कोतवालीच्या मागील भागातून मूर्खाधिराजांची मिरवणूक निघते. 

त्यात शहरवासीय सहभागी होतात. मिरवणुकीची सांगता संमेलनस्थळी होते. सुरुवातीला मूर्खाधिराजांची आरती होऊन कार्यक्रम सुरू होतो. आपल्या विशिष्ट पद्धतीने कार्यक्रम पुढे सरकत असतो. पूर्वी पुरुषच महिलांची भूमिका करत असतं. परंतु आता युवतींचा सहभाग कार्यक्रमात असतो. कार्यक्रमात शिस्त पाळली जाते. आेंगळपणा, अश्लिलता यांना येथे थारा नसतो. कोणी मर्यादा भंग करू लागला तर त्या कलावंताला अक्षरश: खाली आेढले जाते. हजारो लाेकांची उपस्थिती कार्यक्रमाला असते. यावेळी खुले नाट्यगृहामध्ये सोमवार, १३ मार्च रोजी सायंकाळी वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वसंतदादा मानवटकर यांच्यासह महानगरातील कलावंत यात सहभागी होणार आहेत. ज्या जुन्या जाणत्या कलावंतांनी मूर्ख संमेलनाची उंची वाढवली त्यांचे स्मरण दरवर्षी होते. पन्नालालजी शर्मा, बळीराम चापले, नकलाकार डोंगरेमामा, साहित्यिक बाजीराव पाटील, प्रा. नरेंद्र पुरोहित, लोककवी लक्ष्मणसिंह जाजोरिया, छावछरिया, सुरेंद्र शहा, अॅड. बाळासाहेब विसपुते, डेहनकरदादा, जादूगार देशमुख यांच्यासह शेकडो दिवंगतांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांची परंपरा पुढे नेली जात आहे. 
 
... तर संमेलनाच्या सुवर्ण जयंतीला ५० गाढवे लागतील 
४५वे वर्ष असल्याने मूर्खाधिराजाच्या मिरवणुकीमध्ये ४५ गाढवे असली पाहिजे अशी सूचना पत्रकार सिद्धार्थ शर्मा यांनी अशातच आयोजकांना केली. आयोजक म्हणून विकासचंद्र शर्मा यांनी ती उचलून धरताना, गुलजारपुऱ्यातून गाढवे मिळवून द्या, असे सुचवले. तेवढ्यात एक जण म्हणाला, लवकरच मूर्ख संमेलनाची सुवर्ण जयंती साजरी होणार आहे त्यावेळी तर ५० गाढवे लागतील. मूर्ख संमेलनामध्ये गर्दभांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ‘गर्दभराज’ म्हणून त्यांना सन्मान असतो. मूर्ख संमेलनाची तऱ्हा निराळी असते. 
 
बातम्या आणखी आहेत...