आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमात मूर्तिजापूर राज्यात प्रथम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - लोकहितार्थ तसेच पारदर्शकतेतून जलदगतीने कामे होण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम राज्यातील ३५७ तालुक्यात राबवण्यात येत असून, मूर्तिजापूर तालुका हा महाराष्ट्रातून प्रथम आहे. तसेच दप्तरी कामे सर्व ऑनलाईन केली आहेत. यात मूर्तिजापूर तहसीलने मोठ्या जिद्दीने प्रयत्न करून जनतेला सहजपणे सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मूर्तिजापूर तालुका ऑनलाईन फेरफार घेण्यात ई-फेरफारमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे.

महाराष्ट्र शासनाने महसूल विभागातील सेवा संगणकीकरणाच्या माध्यमातून लोकाभिमुख करण्यासाठी दफ्तराचे अद्ययावतीकरण करण्यासाठी राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ई- फेरफार यामध्ये सर्व फेरफार ऑनलाईन घेण्यात येतात. अकोला जिल्हा महाराष्ट्रात ही सुविधा ऑनलाईन सुरू करणारा पहिला जिल्हा ठरला होता. २०१४ मध्ये ई-फेरफारचे ऑनलाइन कामे सुरू केले होते. यामध्ये हस्तलिखित सातबारा बंद करून कार्यालयीन नोंदीनुसार फेरफार साॅफ्टवेअरच्या माध्यमातून केला. नोंदणीकृत अनोंदणीकृत अशा दोन प्रकारात ही विभागणी केली आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात केलेले खरेदी खत, मृत्यूपत्र नोंदणी असे नोंदणीकृतमध्ये समाविष्ट असून, वाटणीपत्र यासारखे व्यवहार अनोंदणीकृत वर्गीकरणात समावेश होत आहे.

आता अचुक नोंदणीची कागदपत्रे तत्काळ : आधुनिकीकरणाच्या माध्यमातून अनेक चुका झाल्या असताना त्या दुरुस्त करून संगणकीकृत कागदपत्रे आता तत्काळ उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकरी वर्गासाठी फायद्याचे ठरले आहे.

यांचे लाभले मार्गदर्शन : कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी जी. एस. निपाणे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. मूर्तिजापूरचे तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांच्यासह श्रीकांत मिसाळ, आर. बी. डाबेराव, मुकेश गोमासे सर्व आठ मंडळांचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी हे कार्य करून यश साध्य केले आहे, असे नायब तहसीलदार वैभव फरतारे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...