धामणगाव बढे - येथील सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुस्लिम समाजाच्या युवकाची निवड करून गावाने सामाजिक एकतेचा नवा आदर्श घालून दिला.
आज सर्वत्र जातीयतेचे विष पेरून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम काही समाज विघातक शक्ती करीत आहे. अनेक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने राहणारे समाज आज एकमेकांकडे संशयाने पाहतात. त्याला मात्र धामणगाव बढे अपवाद आहे. येथील पोलिस स्टेशन अंतर्गत शांतता समितीची बैठक पार पडली.
या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी महामुनी उपस्थित होते. येथे गेल्या ते १० वर्षांंपासून एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. यावर्षी मात्र एक पाऊल पुढे जात येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी येथील उपसरपंच शेख अफसर मो. शफी यांची निवड करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला.
गावकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि नवा आदर्श गावाने घालून दिला. ठाणेदार दीपक वळवी यांना याची माहिती मिळताच त्यांनीसुद्धा या निर्णयाचे स्वागत केले. जिल्हा उपविभागीय अधिकारी महामुनी, अप्पर जि.पो. अधीक्षक डोईफोडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विशेष म्हणजे धामणगाव बढे येथे मुस्लिम समाजाचा ईद मिलन कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान मंदिरात पार पडतो. तर येथे दोन मंदिर मशीद अवघ्या ५० फूट अंतरावर समोरासमोर आहेत. हिंदू-मुस्लीम जनता एकमेकांच्या सणामध्ये उत्साहात सामील होतात. येथे कधीही कुणाला कीर्तनाचा, आरतीचा अजानचा त्रास झालेला नाही. त्यामुळे धामणगाव बढेची सामाजिक एकता संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे. धामणगाव बढेचा उपक्रम जिल्हयातील एकमेव आहे. येथील सामाजिक एकतेने दिलेला संदेश प्रेरणादायी आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळते अप्पर जि. पो. अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी सांगितले.
याप्रसंगी गणेश मंडळाचे अध्यक्ष, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, शांतता समितीचे सदस्य, पत्रकार बंधु, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ठाणेदार दिपक वळवी यांनी केली. तसेच या बैठकीचे आयोजन पीएसआय जाधव, मदन मुळे, वाघ, चांडोल माळी जमादार यांनी केले.