अकोला - मध्यरेल्वेच्या नागपूर विभागाच्या नागपूर-कळमना स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरु असल्याने चार दिवस नागपूर-भुसावळ पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे.
निवडणुच्या सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांची लेकुरवाळी गाडी समजल्या जाणारी पॅसेंजर गाडी ७, ८, १४ १५ ऑक्टोबर रोजी धावणार नाही. अप आणि डाऊन दोन्ही मार्गाने जाणारी गाडी क्रमांक ५१२८५ भुसावळ- नागपूर गाडी क्रमांक ५१२८६ नागपूर -भुसावळ ही गाडी रद्द करण्यात आली आहे. अकोला येथून भुसावळला निघणारी सकाळी १०.२५ वाजताच्या सुमारास निघणारी पॅसेंजर गाडी रद्द झाल्याने आता प्रवाशांना सकाळी ४.४० वाजताची वर्धा-भुसावळ पॅसेंजर गाडीनंतर थेट ११ तासांनी दुपारी २.५५ वाजता नरखेड- भुसावळ पॅसंेजर गाडी आहे. तर रात्री ९.१२ मिनिटांनी नागपूरकडे जाण्यासाठी पॅसेंजर गाडी नसल्याने नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
वर्धेपर्यंतगाडी सुरू ठेवण्याची मागणी
भुसावळकडे जाण्यासाठी सकाळी ४.४० वाजता नंतर थेट दुपारी २.५५ वाजता पॅसेंजर गाडी आहे. तर नागपूरकडे जाण्यासाठी एकमेव रात्री ९.१२ वाजताची पॅसेंजर गाडी चार दिवस बंद राहणार आहे. त्यावर उपाय म्हणून नागपूर-कळमना स्थानकादरम्यान जर काम सुरु असेल तर हीच गाडी वर्धा रेल्वेस्थानकापर्यंत चालवता येऊ शकते. याकडे रेल्वे मंडळावर नव्याने नियुक्त झालेले खासदार संजय धोत्रे यांनी लक्ष द्यावे प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.