आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाची करणी, वनातील झऱ्यांना बारमाही पाणी; टेकडीवर बारमाही पाण्याचे झरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रामध्ये बारमाही पाण्याचे झरे असून, वन्यप्राण्यांची त्यामुळे सोय होत आहे. निसर्गाची ही किमया असून, या झऱ्यांच्या स्रोताचे संशोधन पुरातत्व विभागाकडून झाल्यास इतिहासाची पाने उकलता येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

पातूर वन परिक्षेत्रामध्ये पातूर बीट अंतर्गत नांदखेड वर्ग कंपार्टमेंट नंबर सी-१७२ मध्ये दोन पहाडांच्या मधात जमिनीपासून ३०० ते ४०० फूट उंच टेकडीवर निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो. या पहाडावर ६० फूट लांब २५ फूट रुंद असा मोठा खडक आहे. या खडकावर पाण्याचा जीवंत झरा आहे. ‘तीन तोंडी तलाव’ म्हणून त्याची आेळख आहे. या झऱ्यामध्ये स्वच्छ थंड पाणी बाराही महिने असते. साधारणत: २५ ते ३० फूट खोल, ३० फूट लांब आणि २० फूट रुंद असे खडकाच्या खाली पाणी आहे. 

खडकाला तीन ठिकाणी छिद्र आहेत. एखाद्या विवराप्रमाणे ती भासतात. यामधून पाण्याची खोली जाणता येते. एका छिद्रातून खाली उतरल्यास पायऱ्या केलेल्या आहेत. याच पायऱ्यावरून उतरुन वन्य प्राणी तहान भागवतात. या झऱ्यावर शिवकालीन लिपीत एक लिहिलेला आढळतो. खडकावर महादेवाची पिंड आणि तुळस कोरलेली आहे. पाण्याचे हांडे ठेवण्यासाठी जागा तयार केलेली आहे. पुरातन वारशाचे दर्शन येथे घडते. आजुबाजूला नदी नाला काहीच नाही परंतु पाणी कोठून येते हा चमत्कारच आहे. हा पहाड आणि टेकड्या अजिंठा पर्वतरांगांमध्ये मोडतात, त्यामुळे या बाबत कुतुहल निर्माण होते. 

निसर्गाने केली वन्यप्राण्यांची सोय 
मंगळवार, १८ रोजी ‘वारसा दिन’ झाला. त्या अनुषंगाने निसर्गाने वारसा जतन केल्याची अनेक उदाहरणे दिसतात. या झऱ्यांनी वन्यप्राण्यांची तहान भागवली जात आहे. बारा महिने त्यांना पाणी उपलब्ध होईल, अशी व्यवस्था आहे. नैसर्गिक संपत्तीचे जतन गरजेचे आहे. 
- गोविंद पांडे, वन्यजीव अभ्यासक, अकोला. 
बातम्या आणखी आहेत...