आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारसजवळ रेल्वे रूळ क्रॅक, गँगमनमुळे दुर्घटना टळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वाढत्या तापमानाचा पहिला फटका रेल्वेला बसला. गरमीमुळे पारसजवळ मुंबईकडे जाणारा रेल्वे रूळ क्रॅक झाला. ही घटना शुक्रवारी रात्री वाजताच्या सुमारास उजेडात आली. गँगमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. रूळ क्रॅक झाल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा वेग गायगाव ते पारसदरम्यान ताशी ३० किमी करण्यात आला होता.
तीव्र थंडी किंवा उष्णतेमुळे रेल्वे रूळांना तडा जाण्याच्या घटना घडतात. सध्या दिवसाचे तापमान वाढत आहे. त्याचा फटका बसून पारस यार्डजवळ रूळ क्रॅक झाला. ही घटना रात्रपाळीवर असलेले गँगमन मच्छिंद्र यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. तातडीने रेल्वेचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. अकोल्याहून आरपीएफचे ठाणेप्रमुख राजेश बढे यांच्या नेतृत्वात जवानही दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत या रुळ पूर्ववत करण्याचे काम सुरू होते. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचा ताशी वेग फक्त ३० किमी करण्यात आला होता.
आम्ही तत्काळ पोहोचलो
घटनेची माहिती मिळताच आम्ही तत्काळ रात्री वाजता घटनास्थळी पोहोचलो. आमच्या वरिष्ठांच्या कानावर बाब टाकली. रात्रभर आमचे कर्मचारी घटनास्थळावर थांबले. शनिवारी रेल्वे रुळाचे काम पूर्ण होईल. हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात अशा घटना घडत असतात. मात्र, रेल्वेचे कर्मचारी रात्री बेरात्री डोळ्यात तेल घालून कर्तव्यावर असल्यामुळे दुर्घटना टळतात.
- राजेश बढे, आरपीएफ ठाणेदार, अकोला

गँगमनची सतर्कता
प्रत्येक गँगमनला दोन किलोमीटरचे अंतर दिलेले असते. या रुळाची देखभाल ते रात्रभर करीत असतात. रेल्वे रुळाची क्लिप निघाली असेल तर ती लावणे, कुठे काही दुर्घटना घडत असेल तर त्यावर देखरेख ठेवण्याचे काम ते करीत असतात. गँगमन मच्छिंद्र यांच्या नजरेत हा प्रकार आला नसता तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती.