आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यरूपी रुक्मिणी विवाहाएेवजी लावले गरजू मुलीचे लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भागवत कथा पठण करताना त्यातील प्रसंग समजण्याच्या दृष्टीने नाट्यरूपी, सदृश्य कथा सादर केल्या जातात. कृष्ण जन्म असो वा रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात हे प्रसंग जिवंत दाखवले जातात. त्या काळात झालेला रुक्मिणीचा विवाह सोहळा आज नाट्यरूपी दाखवून त्याचा कथा समजण्यापलीकडे उपयोग होत नाही. पण हीच कथा सादर करण्यासाठी होणाऱ्या खर्चात अजून थोडी वाढ करून गरजू मुलीचा विवाह केला, तर एक संसार उभा राहू शकतो, याच विचाराने प्रेरित होऊन शहराचे उपमहापौर विनोद मापारी यांनी उपक्रम सुरू केला. त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने शहरात होणाऱ्या भागवत कथेत रुक्मिणी विवाहाचा नाट्यरूपी देखावा करता, साक्षात गरजू मुलीचा विवाह लावला जातो. या उपक्रमातून त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.
रिंग रोड येथील जानोरकर मंगल कार्यालयासमोरील प्रांगणात उपमहापौर विनोद मापारी आणि मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले जाते. मागच्या वर्षीपासून त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. रुक्मिणी विवाहाचा सोहळा पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते, पण कलाकारांच्या माध्यमातून विवाह सोहळा दाखवण्याऐवजी एका मुलीचे प्रत्यक्ष विवाह लावून दिले, तर त्यातून एकाच वेळी दोन गोष्टी साध्य होतात. समाजातील अत्यंत गरीब गरजू कुटुंबातील मुलीचा विवाह झाल्याने कुटुंबाला साहाय्य तर होतेच. शिवाय लोकांच्या सहकार्याने संसारोपयोगी साहित्यांचादेखील हातभार लागतो. कथेदरम्यान, एका नव्या संसाराला सुरुवात होऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.

मागील पाच दिवसांपासून संत श्री वासुदेव महाराज स्मृतिप्रीत्यर्थ सुरू असलेल्या या भागवत कथेत रविवार, १७ एप्रिल रोजी रात्री हा विवाह सोहळा संपन्न झाला. यंदा बार्शिटाकळी तालुक्यातील आळंदा येथील भास्कर काळे यांची कन्या रेणुका आणि मलकापूर तालुक्यातील बोदवड येथील नामदेव सोळंके यांचे चिरंजीव योगेश यांचा विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात आयोजन समितीसह आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, महापौर उज्ज्वला देशमुख, नगरसेवक, नगरसेविका, शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले.

यांचेसहकार्य : कोणत्याहीलग्न सोहळ्यात जाताना आपण शुभेच्छांसोबत भेट वस्तू घेऊन जातो. मात्र, या लग्न सोहळ्यात येणाऱ्या मंडळींनी भेटवस्तू घरून आणता आपल्या इच्छेनुसार येथूनच विकत घेतली आहे. कथेला येणाऱ्या भाविकांना हे सांगण्यात आले की, वधूवराला भेटवस्तू घेताना इतर दुकानातून घेण्यापेक्षा कथेच्या स्थळी लावण्यात आलेल्या स्टॉलवरून घ्यावे. यामुळे संसाराला लागणारी प्रत्येक वस्तू, साहित्य येथे असल्याने प्रत्येक वस्तू भेट मिळाली. यात भांड्यांसह कपाट, दिवाण, मिक्सर, फॅन असे मोठे साहित्यदेखील आहे. त्यामुळे एक प्रकारे लोकसहकार्यातून नवीन संसार उभा राहायला हातभार लागला. यासोबतच वऱ्हाडी मंडळीला आदरातिथ्य म्हणून अखिल भारतीय ब्राह्मण सभा यांच्याकडून भोजनाची व्यवस्था करण्यात अाली, तर सायली ब्यूटी पार्लरच्या संचालिका छाया काकडे यांनी वधूवराचे साजश्रुंगार नि:शुल्क करून दिले, तर वधू आणि वर पक्ष यांच्याकडील जवळपास ३०० लोकांची व्यवस्था गजानन मित्र मंडळ करत आहेत. कोणत्याही प्रकारे शासकीय अनुदान घेता, फक्त लोकांच्या सहकार्यातून एका नव्या संसाराला सुरुवात झाली.

विशेष मुलं, ज्येष्ठांना आमंत्रण
सूर्योदय बालगृह, अनाथ आश्रमातील मुले, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक मूकबधिर विद्यालयातील मुलांना विशेष आमंत्रण देण्यात आले. ही मुले, ज्येष्ठ मंडळी या सोहळ्यापासून वंचित राहू नये, तेदेखील या आनंदात सहभागी व्हावे, या उद्देशाने त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले. या मुलांची, ज्येष्ठांची येण्या-जाण्याची व्यवस्था विराट बहुउद्देशीय संस्थेने केली आहे.

सर्व बाजूंनी विचार
मुलीची निवड करताना खूप विचार करावा लागतो. यंदा ७-८ इच्छुक मुलामुलींनी भेट घेतली. चौकशी करून मगच या जोडीची निवड केली. या लग्नात नवदाम्पत्याला लाखाचे साहित्य भेट मिळत असल्याने अनेकांनी आग्रह धरला. मात्र, मित्र परिवाराच्या सहकार्याने योग्य गरजू मुलीची निवड केली.'' विनोद मापारी, उपमहापौर