आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त म्हणतात अधिकारी हप्ते घेतात... महापौरांच्या मते अग्निशमन विभाग सर्वात भ्रष्टाचारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला -  साफसफाई आणि स्वच्छतेवर २९ एप्रिल रोजी झालेल्या महासभेत घमासान चर्चे दरम्यान प्रशासनाने आरोग्य निरिक्षकांकडून अधिकारी हप्ते घेतात असा गंभीर आरोप केला तर महापालिकेत सर्वात जास्त भ्रष्टाचार हा अग्निशमन विभागात होतो, असा दावा महापौरांनी केला. महापालिकेतील दोन्ही महत्वाच्या व्यक्तीनी सभागृहात असे गंभीर आरोप केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. तर महत्वाचे व्यक्तीच असा आरोप करत असतील तर कारवाई करणार कोण? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 
 
अंदाज पत्रकासाठी बोलावलेल्या विशेष सभेत सत्ताधारीसह विरोधी गटातील नगरसेवकांनी प्रथम साफसफाई, स्वच्छता यावर चर्चा करुन ठोस उपाय योजना करा त्या नंतरच अंदाज पत्रकावर चर्चा करा अशी जोरदार मागणी केली. ही मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी मंजुर केली. या चर्चेत राजेश मिश्रा यांनी आक्रमक भूमिका मांडत प्रशासनाने नियुक्त केलेले सफाई कर्मचारी प्रत्यक्षात सफाईसाठी येतच नाही, यावर ठोस उपाय योजना करण्याची मागणी केली. भाजप गटनेते राहुल देशमुख यांनी जलवाहिनी फुटण्याच्या प्रकाराकडे पाणी पुरवठा विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. तर अजय शर्मा यांनी स्वच्छतेसोबतच जलकुंभी फोफावली असून जलकुंभी काढण्यासाठी कायम स्वरुपी उपाय योजना करण्याची मागणी केली. तर अनेक नगरसेवकांनी शहरातील विविध विभागात जमा होणारा कचरा उचलला जात नाही तसेच सफाई कामगार येत नसल्याने साफसफाई होत नसल्याचा आरोप केला. 
या सर्व प्रकाराला आरोग्य निरिक्षक जबाबदार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट करताना हजेरीवर कामगार दिसतात मात्र काम करीत नाही, असे सांगून आरोग्य निरिक्षकांकडून अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप प्रशासनाने केला. तर महापालिकेच्या विभागांपैकी सर्वाधिक भ्रष्टाचार हा अग्निशमन विभागात होतो, असा दावा महापौर विजय अग्रवाल यांनी केला. नगरसेवक सुमनताई गावंडे, पेंटर रहीम, शाहिन अंजुम, नौशाद खान, हरीश अालिमचंदानी, सुजाता अहिर, योगिता पावसाळे, मुस्तफा खान, सपना नवले, विजय इंगळे, गजानन चव्हाण, बाळ टाले, रश्मी अवचार, उषा विरक, तुषार भिरड, सुनिल क्षिरसागर, सारिका जयस्वाल, अॅड.धनश्री अभ्यंकर-देव, राहुल इंगळे, अनिल मुरुमकार, संजय बडोणे, साजिदखान पठाण, मंजुषा शेळके, डॉ.जिशान खान, पराग कांबळे आदी नगरसेवकांनी साफसफाई होत नसल्याबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर प्रशासनाने लवकरात लवकर ठोस उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर जे कर्मचारी काम चुकारपणा करतील, त्यांच्यावर दंडात्मक अथवा निलंबनाची कारवाई प्रशासन करेल, या कार्यवाहीत सभागृहाची साथ द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले. 

महापौर की प्रशासन अधिकारी 
सभेत नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करायचे त्याचे उत्तर प्रशासनाने द्यायचे, असा नियम आहे. मात्र नगरसेवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रशासना ऐवजी महापौरांनीच उत्तरे दिली. या प्रकारामुळे पिठासिन अधिकारी महापौर आहेत की महापौर प्रशासन अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत, अशी चर्चा या निमित्ताने सभागृहात सुरु होती. 

मलेरियाचे टापरे यांना केले निलंबित 
मलेरिया विभागाच्या वतीने फॉगींग मशिन तसेच फवारणीचे काम होत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. या बाबत मलेरिया विभागाचे राजेंद्र टापरे यांना महासभेत माहिती देता आली नाही तसेच महासभेत जी माहिती दिली, ती असमाधानकारक असल्याने प्रशासनाने राजेंद्र टापरे यांना निलंबित केले. 
बातम्या आणखी आहेत...