आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्तांच्या बैठकीकडे फिरवली गटनेत्यांनी पाठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यातील दुरी कमी होण्याऐवजी वाढत जात आहे. आयुक्त अजय लहाने यांनी १२ एप्रिलला वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह गटनेत्यांच्या बोलावलेल्या बैठकीकडे पदाधिकाऱ्यांसह गटनेत्यांनी पाठ फिरवली. केवळ तीन गटनेते या बैठकीला उपस्थित राहिल्याने वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी, दुसरीकडे चांगले पदाधिकारी, अधिकारी असे सर्व महापालिकेत जुळून आले असताना केवळ समन्वयाच्या अभावामुळे पुन्हा एकदा पदाधिकारी आणि प्रशासनात वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक पाऊल मागे घेण्यास कोणीही तयार नसल्याने या वादात भर पडली आहे. स्थायी समिती अस्तित्वात आल्याने अधिनियमानुसार आर्थिक व्यवहार करताना स्थायी समितीची मंजुरी घेणे प्रशासनाला भाग पडत आहे. त्यामुळेच एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण आता महापालिकेत सुरू झाल्याचे अनुभवास येत आहे.

मालमत्तांची मोजणी करण्याचे काम कंपनीमार्फत करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. या अनुषंगानेच आयुक्तांनी महापौर, स्थायी समिती सभापती, विविध पक्षांचे गटनेते आदींना सकाळी त्यांच्याच दालनात बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीत सर्वांशी चर्चा करून एकमताने या प्रस्तावास स्थायी समितीत मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केल्या गेली. परंतु, प्रत्यक्षात शिवसेनेच्या गटनेत्या मंजूषा शेळके, भारिप-बमसंचे गटनेते गजानन गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजकुमार मुलचंदानी हे तीन गटनेतेच उपस्थित राहिले. त्यामुळे प्रत्यक्ष बैठकीत मूळ विषयांऐवजी इतर विषयांवरच चर्चा झाली. त्यामुळे प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत समन्वय साधण्यासाठी केलेला प्रयत्न अपयशी ठरला.

आमदारांनी मध्यस्थी भूमिका पार पाडावी
पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात वाढणाऱ्या दरीचा परिणाम विकासकामांवर होऊ नये, अशी सत्ताधारी गटासह विरोधी गटातील अनेक नगरसेवकांची इच्छा आहे. त्यामुळेच हा वाद वाढण्याआधीच आमदारांनी या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका पार पाडावी, असे मत नाव छापण्याच्या अटीवर नगरसेवकांनी व्यक्त केले.