आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडी मारल्यास कारवाई, आयुक्तांनी दिला सफाई कामगारांना कडक इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कामात कुचराई अजिबात खपवून घेतली जाणार नाही. तसेच कोणतीही पूर्वसूचना देता दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आयुक्त अजय लहाने यांनी सफाई कामगारांना दिला.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आयुक्त लहाने म्हणाले की, यापुढे पूर्वसूचना देता अनुपस्थित राहणे महागात पडेल. एक दिवस पूर्वसूचना देता गैरहजर राहिल्यास एक महिन्याच्या वेतनाची कपात केली जाईल. ही बाब कर्मचाऱ्यांनी गंभीरतेने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच मान्सूनपूर्व शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई झोननिहाय करावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील कोणते नाले स्वच्छ करावेत, त्याबाबतचा अहवाल लवकरात लवकर देऊन ते ३० मे यादरम्यान प्रत्येक मोठ्या नालीच्या सफाईचे काम पूर्ण करावे. त्याच बरोबर स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छतागृहाचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या वेळी शहरातील दैनंदिन स्वच्छतेबाबत आढावा घेण्यात आला. स्वच्छतेच्या कामात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करून त्यांचे निरसन करण्यात आले. या वेळी उपायुक्त समाधान सोळंके, राजेंद्र घनबहादूर, जी. एम. पांडे, वासुदेव वाघाळकर, अनिल बिडवे, कैलास पुंडे, अजय गुजर, अब्दुल मतीन यांच्यासह आरोग्य निरीक्षक, वॉर्ड चपराशी या आढावा बैठकीला उपस्थित होते.

घंटागाडीला दरमहा ३० रुपये
घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीच्या चालकाला नागरिकांनी ३० रुपये दरमहा द्यावेत. याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, या आशयाची सूचना घंटागाडीवर लिहावी, जेणेकरून पैसे देण्याबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होईल, अशी सूचनाही आयुक्त अजय लहाने यांनी केली.

बंद पथदिव्यांची नोंद घ्यावी
प्रत्येक आरोग्य निरीक्षक आणि वॉर्ड चपराशी यांनी रोज सायंकाळी आपापल्या प्रभागातील पथदिव्यांची तपासणी करावी. बंद असलेल्या पथदिव्यांची माहिती महापालिकेच्या हेल्पलाइनवर द्यावी, असे आदेशही आयुक्त अजय लहाने यांनी दिले अाहे.
आयुक्त अजय लहाने यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली.