आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सभापती-ठाणेदारांमुळे निवळला वाद, माफीसाठी ठिय्या आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- थकित वेतनाची मागणी करण्यासाठी २० ऑगस्टला आयुक्तांकडे गेल्यानंतर त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केल्याचा आरोप करत सफाई कामगारांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन पुकारले होते. आयुक्तांनी माफी मागितल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही, असा आग्रह धरल्याने महापालिका परिसरात काही तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तर पोलिस बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. परंतु, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल ठाणेदार अनिल जुमळे यांनी हे प्रकरण शांततेने मिटविल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा महापालिकेत तोडफोड तसेच लाठी चार्ज होण्याची शक्यता होती.

सफाई कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन थकले आहे. सफाई कामगारांचा श्रावण महिन्यात गोगा नवमी हा मोठा उत्सव असतो. त्यामुळे दरवर्षी गोगा नवमीदरम्यान सफाई कामगार एकतर वेतनाची अथवा फेस्टिव्हल अॅडव्हॉन्सची मागणी करतात. यावर्षी चार दिवसांवर गोगा नवमी उत्सव येऊन ठेपला असताना वेतन झाल्याने सफाई कामगारांच्या नेत्यांनी स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वी सभापती विजय अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. एक महिन्याचे वेतन सेवानिवृत्ती वेतन तसेच दहा हजार रुपये फेस्टिवल अॅडव्हॉन्स एक-दोन दिवसांत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर सभा सुरू होताच, महिला सफाई कामगार स्थायी समितीत धडकल्या. पुन्हा अर्धा तास चर्चा झाल्यानंतर आयुक्त त्यांच्या दालनात आल्याची माहिती महिला सफाई कामगारांना मिळाली. त्यामुळे या महिला सफाई कामगारांनी आपला मोर्चा आयुक्तांच्या दालनाकडे वळवला.

आयुक्तांच्या दालनाकडे मोर्चा पोहोचताच, त्यांनी नारेबाजी सुरू केली. त्याच बरोबर आयुक्त कार्यालयाच्या लोखंडी ग्रिलला लाथा मारल्या. या प्रकाराने आयुक्त अजय लहाने संतप्त झाले. त्यांनी कक्षा बाहेर येऊन आर्थिक परिस्थिती नसल्याने वेतन देऊ शकत नाही, असे सांगीतले. यामुळे वाद वाढला. या दरम्यान काही सफाई कामगारांनी आयुक्तांनी आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याचा आरोप केल्याने एकच गोंधळ उडाला.

परिणामीमहापालिकेत सफाई कामगारांची संख्या शेकडोच्यावर पोहोचली. महापालिकेत गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळताच. शहर कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे आपल्या स्टाफसह महापालिकेत दाखल झाले. त्यांनी कामगार नेते आयुक्तांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान विजय अग्रवाल यांनी पुन्हा या नेत्यांशी चर्चा केली. प्रशासनाकडून जर काही आक्षेपार्ह व्यक्तव्य झाले असल्यास त्यांनी सर्वांची जाहिर माफी मागितली. परंतु, जोपर्यंत आयुक्त माफी मागणार नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका सफाई कामगारांनी घेतली. या प्रकारामुळे वातावरण पुन्हा चिघळले. परंतु, ठाणेदार अनिल जुमळे यांनी सफाई कामगार नेत्यांशी पुन्हा चर्चा केली. झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनीही दिलगिरी व्यक्त करून सर्वांची समजुत काढली. दरम्यान, सभापती विजय अग्रवाल यांनी सर्वांना चर्चेसाठी सभागृहात बोलावून झाली गोष्ट विसरून जाण्याचे आवाहन करतानाच माफ करणारा मोठा असतो, त्यामुळे आपण मोठ्या मनाने माफ करावे, अशी विनंती केली. अखेर सभापती ठाणेदारांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली. यादरम्यान आयुक्तांनीही दहा हजार रुपये फेस्टिवल अॅडव्हॉन्सच्या धनादेशावर स्वाक्षरी केली. त्यामुळे सफाई कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले.

१४व्या वित्त आयोगातून उसनवारी : सभापतीविजय अग्रवाल यांनी परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेऊन एलबीटीचे अनुदान येईपर्यंत १४ व्या वित्त आयोगातून एक महिन्याचे वेतन एक महिन्याचे निवृत्ती वेतन द्यावे, असे पत्र प्रशासनाला दिले. या सर्व प्रकारामुळे महापालिकेतला संघर्ष टळला.
...अन्यथा झाला असता अनर्थ
मनपातील वातावरण चिघळले होते. शेकडो सफाई कामगार महिला कामगारांनी ठिय्या देत, जोपर्यंत आयुक्त माफी मागणार नाहीत, तोपर्यंत महापालिकेतून जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. परिस्थिती नियंत्रणात आली नसती तर कदाचित महापालिकेत लाठी चार्ज करावा लागला असता.परंतु, सभापती ठाणेदारांनी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली नसती तर कदाचित महापालिकेत अनर्थ झाला असता.
महापालिका कार्यालयात सफाई कामगारांनी असे ठिय्या आंदोलन केले. छाया: नीरज भांगे
बातम्या आणखी आहेत...