आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका प्रशासनाविरोधात अविश्वासाचे ढग, सभापती अवमानप्रकरण आमदारांचा संताप व्यक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनपा स्थायी समितीचे सभापती बाळ टाले यांनी २४ तासात मागितलेला खुलासा प्रशासनाने दिल्याने या प्रकरणाचा रोष वाढत आहे. या प्रकरणात आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकरांनी लक्ष घातले असून त्यांनीही याबाबत चिड व्यक्त केली आहे. या सर्व प्रकारामुळे प्रशासन ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने भाजप नगरसेवकांनीच प्रशासनावर अविश्वास आणण्यासाठी आता पक्षावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.
 
त्यामुळे प्रशासना विरोधात अविश्वासाचे ढग घोंगावत असून हे प्रकरण चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थायी समितीने मंजुर केलेले ठराव प्रशासनाकडे विलंबाने जातात. त्याचा परिणाम कामकाजावर होतो. 

या अनुषंगाने प्रशासनाने स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना पत्र देवून यापुढे सभा झाल्या नंतर तीन दिवसाच्या आत मंजुर प्रस्ताव प्रशासनाकडे आल्यास गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा दिला होता. पदाधिकारी हे प्रशासनाच्या अंडर काम करीत नाहीत, त्यामुळे कोणतेही कारण नसताना पदाधिकाऱ्यांना गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा देत येत नाही. हा इशारा कर्मचाऱ्यांना देता येतो. मात्र बहुधा पदाधिकारी म्हणजे आपल्या हाताखालील इतर कर्मचारीच, असा गैरसमज प्रशासनाचा झाला असल्यानेच हा इशारा देण्यात आला. या इशाऱ्यावर सभापती बाळ टाले यांनी प्रशासनाला याबाबतचा खुलासा २४ तासात मागीतला. २४ तास लोटूनही प्रशासनाने हा खुलासा केला नाही. त्यामुळे हे प्रकरण चिघळले आहे. आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांनी संताप व्यक्त केला. 

भाजपच्या इतर नगरसेवकांनीही सभापतींना गंभीर दखल घेतली जाईल, असे पत्र दिले जाते तर नगरसेवकांचे काय? असा प्रश्न पक्षनेत्यांसमोर उपस्थित केला. त्यामुळे प्रशासन खुलासा करीत नसेल तर प्रशासनावर अविश्वास आणा, अशी मागणी नगरसेवकांनी केली असून यात सभापती बाळ टाले पुढाकार घेण्याची शक्यता आहे. महापौर विजय अग्रवाल उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. त्याना रुग्णालयातून सुटी मिळाली की स्वाक्षरी मोहिम राबवली जाण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे हे प्रकरण अधिक वाढण्याची शक्यता आहे.  
 
विरोधी गटातील नगरसेवकांची तयारी 
मनपा प्रशासना विरोधातील अविश्वास ठराव हा सर्वानुमते मंजुर व्हावा, अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळेच विरोधी गटातील काही पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी बोलून चाचपणी केली जात आहे. या चाचपणीत विरोधी गटातील काही नगरसेवकांनी या ठरावाला पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 
 
यापूर्वी दोन मनपा आयुक्तांवर अविश्वास 
यापूर्वी संजय काकडे यांच्यावर नगरसेवकांची कामे करणे, प्रश्न सोडवणे आदी विविध कारणांसाठी अविश्वास प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता. तर चंद्रशेखर रोकडे यांना भाजपच्या एका माजी स्वीकृत नगरसेवकाला मारहाण करण्या प्रकरणी अविश्वासाचा सामना करावा लागला होता. तर आता सभापती बाळ टाले यांना गंभीर दखल घेतली जाईल,असे पत्र पाठवल्याने अविश्वासाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 
बातम्या आणखी आहेत...