आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्थापित करण्यापूर्वी आत्महत्येची परवानगी द्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शिवसेना वसाहतीच्या बाजूला समीर अग्रवाल यांच्या शेतामध्ये गेली २०-२१ वर्षे वास्तव्य करणाऱ्या ५०० कुटुंबांना घर खाली करण्याबाबत महापालिकेकडून नोटीस बजावली जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये धास्ती असून आम्हाला येथून विस्थापित करण्यापूर्वी आत्महत्या करण्याची परवानगी द्या, असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. मोलमजुरी करुन गुजराण करणाऱ्यांचा प्रशासनाने विचार करावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
 
इतकी वर्षे येथे राहिलो परंतु आता आम्हाला घर खाली करा नाही तर तुमची घरे तोडण्यात येतील, अशी नोटीस पाठवण्यात येत आहे. आम्ही दुसरीकडे कोठे जावे हा प्रश्न आहे. आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबीय असल्याने अन्य पर्याय नाही. आमची घरे तोडण्यात आली तर आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळणार आहे. या स्थितीचा विचार करावा आणि न्याय द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
 
 निवेदन देणाऱ्यांमध्ये रेखा इंगळे, सुनील इंगळे, देवका कांबळे, रामभाऊ धुमाळे, शोभा बोबडे, वंदना बनकर, अर्जून नृपनारायण, प्रमोद अनासने, निरंजन नेहरे, दुर्गाबाई मिस्त्री, रमेश कदम, संतोष अढाऊ, सचिन नटखट, उषा डिपके, आकाश चोरे, उज्ज्वला इंगळे, मंगला गोरे, तुळशीराम इटनारे, संजय पवार, राजकुमारी तिवारी, प्रभाकर पतिंगे, शेषराव नीळकंठ, सविता भांबेरे, शालिनी बांबटकर, अन्नपूर्णा गोरे आदींसह या भागातील शेकडो नागरिकांची स्वाक्षरी आहे. 
बातम्या आणखी आहेत...