आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहितीचा अधिकाराच्या काळात उमेदवारी बाद झालेल्यांची नावेही दिली जात नाही माध्यमांना (महाकौल)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - केंद्र शासनाने माहितीचा अधिकार सर्वसामान्य जनतेला बहाल केला आहे. या माहिती अधिकार नियमा अंतर्गत सर्वसामान्य जनतेला माहिती देण्याचे काम शासकीय कार्यालयांना केले जाते. मात्र, असे असले तरी महापालिका निवडणूक विभाग मात्र महापालिका निवडणुकीत बाद झालेल्या उमेदवारांची नावे प्रसार माध्यमांना देण्यास तयार नाही. ही नावे प्रसार माध्यमांना देण्यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. 
 
तूर्तास महापालिकेच्या निवडणुकीची प्रोसेस सुरू आहे. तीन फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते, तर चार फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे दाखल झालेल्या अर्जाची छाननी केली. साधारणपणे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांसह सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले? याबाबत उत्सुकता असते.
 
मात्र, महापालिका निवडणूक विभागाने चार फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज बाद झालेल्या उमेदवारांची केवळ संख्या दिली. सहा उमेदवारांचे अर्ज बाद झाले. मात्र, बाद झालेले हे सहा उमेदवार कोण? याबाबतची माहिती निवडणूक विभागाने प्रसार माध्यमांना दिली नाही. परिणामी उमेदवारी अर्ज बाद झालेले ते सहा इच्छुक कोण? ही बाब गुलदस्त्यात राहिली. 
 
केंद्र शासनाने माहितीचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना बहाल केला असताना ही नावे गुपीत ठेवण्यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. महापालिका निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार केवळ एवढ्यावरच थांबलेला नाही, तर एकूण उमेदवारी अर्ज किती दाखल झाले? याचा निश्चित आकडाही निवडणूक विभागाला अथवा संबंधित अधिकाऱ्यांना देता आला नाही. या आकड्यात सातत्याने बदल झाला आहे. यावरून महापालिका प्रशासनाने ही निवडणूक किती गंभीरतेने घेतली आहे? याचा प्रत्यय येतो. 
 
उमेदवारांच्या आकड्यात सातत्याने बदल : तीन फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. तीन तारखेला एकूण ६८८ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर २७ जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत एकूण ८८१ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. मात्र, या आकड्यात नंतर बदल झाला. सहा अर्ज बाद झाल्यानंतर हा आकडा तीन फेब्रुवारीचा ७३६ तर एकूण ७५० असा देण्यात आला. 
 
त्या सहा जणांची नावे गुलदस्त्यात 
ज्या सहा उमेदवारांचे अर्ज रिजेक्ट झाले. त्यांची नावे झोन निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. महापालिका निवडणूक विभागाला केवळ ही नावे प्रसार माध्यमांना देणे आवश्यक होते. मात्र, असे असतानाही ही नावे प्रसार माध्यमांना देण्यात आली नाही. त्यामुळे अर्ज बाद झालेले ते सहा उमेदवार कोण? हा प्रश्न गुलदस्त्यात राहिला आहे.