आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वच्छ भारत’ अभियान: शौचालय बांधण्याचा लक्ष्यांक नगर परिषदांकडून बेदखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यातील बहुतेक नगरपरिषदांनी शौचालय बांधकामाचा लक्ष्यांक (टार्गेट) बेदखल केला असून, सहापैकी केवळ एका नगरपरिषदेचे काम चांगले असल्याचा अहवाल समोर आला आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील अर्धा डझन नगरपरिषदांमध्ये सध्या शौचालयांचे बांधकाम सुरु आहे. 
 
उघड्यावर शौच केल्याने परिसरात होणारी घाण, त्यातून उद््भवणारी रोगराई आणि पर्यायाने आरोग्य राखण्यावर होणारा अनाठायी खर्च यामुळे िजल्हा हगणदारीमुक्त केला जावा, असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेतून ‘घर तेथे शौचालय’ हा कार्यक्रम राबवण्याचे शासनाने ठरवले आहे. या कार्यक्रमानुसार, अकोट, मूर्तीजापूर, बाळापूर, पातूर, तेल्हारा बार्शीटाकळी नगरपरिषदांनी शौचालय बांधणीची कामे सुरु केली आहे. परंतु वारंवार सूचना देऊन आढावा घेऊनही त्यात फारशी प्रगती झाली नाही. केवळ मूर्तीजापूर नगरपरिषदेने उत्कृष्ट कामगिरी बजावल्याचे शासनाला सादर झालेल्या ऑनलाइन अहवालाचे म्हणणे आहे. मूर्तीजापूर शहरात १५७४ शौचालयांचे बांधकाम करायचे होते, असे २०१५ च्या सर्वेक्षणांती स्पष्ट झाले आहे. त्या तुलनेत गेल्या महिनाअखेर तेथे १०४० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 
 
याउलट बाळापूर नगरपरिषदेत सर्वात कमी शौचालयांचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. २०१५ च्या सर्वेक्षणानुसार, या शहरात २८१५ शौचालयांचे बांधकाम करावयाचे होते. परंतु तेथे आतापर्यंत फक्त ५१८ शौचालये बांधली गेली. अशीच स्थिती अकोट पातूरची आहे. अकोटात ४४११ पैकी १३१० तर पातूर येथे ११९५ पैकी ४५२ शौचालयांचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. दरम्यान तेल्हारा नगरपरिषदेने जानेवारीच्या अखेरपर्यंत १०११ पैकी ५९३ शौचालये बांधली आहेत. शौचालय बांधकामासाठी निवड झाल्यानंतर सदर लाभार्थ्याला प्रत्यक्ष काम सुरु असल्याचा अहवाल सप्रमाण वेळोवेळी नगरपरिषदेला सादर करावा लागतो. शिवाय सर्वात शेवटी बांधकाम पूर्ण झाल्याचे छायाचित्र काढून या संस्थेला द्यावे लागते. शेवटच्या टप्प्याची रक्कम त्याशिवाय द्यायची नाही, अशी अट या योजनेत टाकण्यात आली आहे. 
 
पुढे काय होणार? 
स्वच्छभारत’ हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे त्याची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे केली जाणार आहे. ज्या नगरपरिषदांनी अद्याप या कामाकडे लक्ष दिले नाही, तेथील मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तशा सूचना दिल्या जाणार आहेत. 
 
बार्शी टाकळीचाही प्रवेश झाला 
केंद्र राज्य शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानामध्ये आतापर्यंत बार्शीटाकळी नगरपरिषदेचा समावेश नव्हता. दरम्यान अलीकडेच तेथेही शौचालय बांधण्याचे काम सुरु झाले आहे. २०१५ च्या सर्वेक्षणानुसार तेथे ११८४ शौचालयांचे बांधकाम करावयाचे आहे. त्यापैकी आतापर्यंत २०० लाभार्थ्यांना बांधकामाचे अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती दिली आहे. 
 
१७  हजार रुपयांचे आहे लाभार्थ्यास अनुदान 
शौचालय बांधण्यासाठी शासनातर्फे प्रतिकुटुंब १७ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तीन टप्प्यात या रकमेचे वितरण होते. पहिला दुसरा टप्पा सहा-सहा हजारांचा असतो. तर शेवटचा टप्पा पाच हजार रुपयांचा असतो. नगरपरिषदांच्या श्रेणीनुसार काही शहरांसाठी एकूण १५ हजार आहे. त्याठिकाणी शेवटचा टप्पा तीन हजार रुपयांचा आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...