आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण महाविद्यालयांसोबत क्लासेसवाल्यांचे ‘कनेक्शन’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महानगरात इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने सुरु आहेत. त्यामुळे कोचिंग क्लास संचालक स्वत:चेच क्लासेस महाविद्यालये असलेल्या काहींची कोंडी झाली आहे. स्वत:च्या कनिष्ठ महाविद्यालयात आपल्याच कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता धुसर असल्याने तसेच शहरातीलच करार केलेल्या काही महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्याकडे येणार नसल्याने ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे सल्ले देणे सुरु केले आहेत. त्यामुळे यंदा जादा गुण घेतलेला शहरी विद्यार्थी प्रवेशाच्या बाबतीत ग्रामीण विद्यार्थ्यांवर भारी पडण्याची शक्यता आहे. 
 
आतापर्यंत अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश पद्धती नसल्याने कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश काही कोचिंग क्लासचे संचालक निश्चित करत असत. बहुतांश कोचिंग क्लास संचालकाचे स्वत:चेच विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये असल्याने त्यांच्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र, यंदापासून अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कोचिंग क्लास संचालकांसमोर विद्यार्थांच्या अकरावी, बारावी प्रवेशाची सोबतच त्यांच्या परीक्षांची चिंता आहे. त्यावर आता कोचिंग क्लास संचालकांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. जेईई नीटच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मिटींग सुरु केल्या आहेत. या मिटींगमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्रामीण भागातील विशिष्ट कनिष्ठ महाविद्यालयात घेण्याचे त्यांना सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, कॉलेजमध्ये नाही गेले तरी चालेल, असेही सांगण्यात येत आहे. 

त्याचप्रमाणेच यंदापासून प्रत्येक महाविद्यालयात तासिका होतात की नाही, हे भरारी पथकाद्धारे तपासण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर पालकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत शिक्षण विभागालाच मॅनेज करण्याचे मनसुबे कोचिंग क्लास संचालकांचे असल्याचे जरी दिसून येत असले तरी शिक्षण विभाग त्यांना भीक घालणार नसल्याचे वातावरण आहे. 

कोचिंग क्लासमध्ये पालकांच्या मिटींग : दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया जाहीर होण्यापूर्वीच कोचिंग क्लासमध्ये जेईई नीटसाठी प्रवेश फुल्ल झाले. मात्र आता प्रवेशासाठी निश्चित केलेले कनिष्ठ महाविद्यालय मिळणार नसल्याने कोचिंग क्लास संचालकांनी पालकांच्या मिटींग सुरु केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी सिव्हिल लाइन्स रोडवरील दिल्लीच्या एका कोचिंग क्लास संचालकांनी पालकांची मिटींग घेतली पातूर येथे अकरावीसाठी प्रवेश करण्याचे सल्ले दिल्याची माहिती आहे.
 
तालुक्यांतील काही महाविद्यालयांसोबत करार :कोचिंग क्लास संचालकांनी ग्रामीण कनिष्ठ महाविद्यालयांसोबत चर्चा करून आमच्या विद्यार्थांना प्रवेश द्या, तुमच्याच महाविद्यालयाचा नावलौकिक वाढेल, अशी बोलणी केली आहे. तसेच विद्यार्थांना तासिकांना हजर राहण्याचे ‘बक्षीस’ही देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागातील महाविद्यालयांतील प्रवेश क्षमतेवरून किती शहरी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे. 

स्थानिक ग्रामीण विद्यार्थ्यांवर होणार अन्याय 
अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धत ही महानगरापुरती मर्यादित आहे, ग्रामीण भागात नाही. त्यामुळे शहरातील मोठ्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयात होतील. अर्थातच अशा विद्यार्थांना दहावीच्या परीक्षेत जादा गुण असल्याने गुणानुक्रमे त्यांना आधी प्रवेश मिळेल ग्रामीण विद्यार्थ्यांना पाहिजे त्या विज्ञान शाखेतील विषयांना प्रवेश मिळण्याची शक्यता कमी आहे. 

भरारी पथकाद्वारे तासिकांची चौकशी 
^इयत्ता अकरावी,बारावीच्या तासिकांना विद्यार्थी हजर राहणे अत्यावश्यक आहे. तासिकांना विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याची गरज नाही, असे पालकांना सांगितले जाते. मात्र यंदापासून भरारी पथकाद्वारे तासिका होत आहेत की नाही, याची चौकशी करू, अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात परीक्षेला बसता येणार नाही. प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी माध्यमिक. 
बातम्या आणखी आहेत...