आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलव्यवस्थापन तंत्राचा तरुण संशोधकांनी फेरविचार करावा- माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - देशातील युवा संशोधकांनी जलव्यवस्थापन तंत्राचा फेरविचार करावा, जुने तंत्रज्ञान कालबाह्य झाले आहे, त्यामुळे संशोधनाची दिशा तसेच अभ्यासक्रमात बदल करावा लागेल असे आवाहन राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. 
 
पंदेकृविचे प्रतीकुलपती, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू प्रमुख पाहुणे होते. ‘हे सुंदर आकाश’ विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्रद्धा वानखडे हिने ‘जय शारदे वागेश्वरी’ गीत सादर करुन सुंदर वातावरण निर्मिती केली. 
 
डॉ. पुरी म्हणाले, कमी पाणी लागणारे वाण शोधले पाहिजे. शास्त्रज्ञांनी त्याकडे लक्ष द्यावे. कृषी उत्पादन वाढले परंतु विपणन तंत्र अवगत केले नाही तर उपयोग होणार नाही. त्यात आमुलाग्र बदल करावा लागेल. विद्यापीठांनी त्याकडे लक्ष द्यावे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये ४० टक्केवर जागा रिक्त आहेत. ही स्थिती राहिल्यास संशोधनावर त्याचा परिणाम होईल, याकडेही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. 
 
डॉ. देशमुख यांनी इस्त्रायलच्या ‘किबुत्झ’ चळवळीचा आवर्जून उल्लेख केला. सहकारी तत्त्वावर चालणारी ही चळवळ असून त्याद्वारे आर्थिक आणि सामाजिक उत्कर्ष करण्यात येते. समाजघटक सबळ व्हावा हा त्यामागचा विचार आहे.
 
तसा विचार आपल्याकडे करता येऊ शकतो का, याकडेही लक्ष वेधले. अभ्यास, निर्मिती आणि योगदान, या त्रिसुत्रीवर किबुत्झची वाटचाल सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. समारंभाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केले. 
 
विद्यापीठाच्या ५७ शिफारशी यंदा मंजूर झाल्या आहेत. शेतीत मुलभूत बदल घडवून आणण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांची आहे हे हेरून वाटचाल करत आहोत. विश्व खाद्य संघटनेने केवळ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी ऑनलाईन डिग्री देण्याबाबत करार केला आहे.
 
जागतिक बँकेने खारपाणपट्टा विकासासाठी हजार कोटीचा प्रकल्प मंजूर केला असून, त्यात पंदेकृविचाही सहभाग आहे, असे सांगितले. पदव्या प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. 

२८ विद्यार्थ्यांना प्रतीकुलपती पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते पीएच. डी. प्रदान केली. विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना पदव्यांचा अनुग्रह केला. एमएस्सी अॅग्रीची सुवर्णा सोमनाथ गारे, मंगेश शेळके, प्रवीण चव्हाण, एम. टेक कृषी अभियांत्रिकीतील अर्चना येवले, बीएस्सी अॅग्रीचा आदित्य भास्कर घोगरे, दुग्ध शाखेचे विशाल बेंदरे, माळी, कांचन वानखडे, मनोज जाधव, अश्विनी साळोकार, प्रियंका जाधव, सिद्धेश नानोटी, अनुसूचित जाती विद्यार्थ्यांतून दीपकसिंग कनेरिया, राणी घाडगे, चंदा मिश्रा, अश्विनी वाघचौरे, बीएस्सी वनविद्याची पवीन प्रेझ सन्नी या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले. सर्वाधिक सुवर्ण पदके प्राप्त करणारी आगा मकबुल, विकास रामटेके अनुपस्थित होते.
 
या प्रसंगी चेरी हंटन अमेरिका, निलिमा रविप्रकाश दाणी, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तापस भट्टाचार्य, म्हापसूचे कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा, माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, डॉ. हि. ब. उलेमाले, डॉ. शरद निंबाळकर, संशोधन संचालक डॉ.दिलीप मानकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, कृषी अधिष्ठाता डॉ. विलास भाले विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
 
उत्कृष्ट संशोधन कार्यासाठी डॉ. ई. आर. वैद्य, डॉ. एस. एन. देशमुख, डॉ. एस. एस. निचळ, एस. बी. खरात, डॉ. पी. एन. माने, डॉ. पी. एच. बकाने, डॉ. प्रदीप बोरकर, डॉ.महेंद्र नागदेवे, अश्विनी तळोकार, दीपिका दुधराम, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतून एस. जी. सूर्यवंशी, एस.आर. बोदडे, उत्कृष्ट शिक्षक म्हणून डॉ. एस. के. ठाकरे, डॉ. एस. आर. पोटदुखे, डॉ. पी. पी. वानखडे, डॉ. मेघा डहाळे. एकूण २७ सुवर्ण, १४ रौप्यपदके, ३२ रोख बक्षीसे तर पुस्तक स्वरुपात पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मानकर यांनी केले. 
 
कुलगुरू डॉ. दाणी यांनी व्यक्त केले शल्य 
अकोल्याच्या भारत विद्यालयाचे विद्यार्थी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू झाले ही अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब राहिली. त्यांचा कार्यकाळ येत्या सहा महिन्यात संपणार असून हा दीक्षांत समारंभ शेवटचा राहणार असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. १९७४ साली कृषी विद्यापीठातून पदवी घेण्यास आपण उपस्थित राहू शकलो नाही, त्याचे शल्य आजही बोचते. त्या क्षणाला मुकल्याचे शल्य त्यांनी व्यक्त केले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा दीक्षांत समारंभाची फोटोज...