आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलढाणा: डॉ. आंबेडकर यांना जयंती निमित्त जिल्ह्यात अभिवादन, काढली मोटार सायकल रॅली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलढाणा - सायंकाळची वेळ, उंच आकाशात फडफडणारे पंचशील निळे ध्वज, फटाक्याची आतषबाजी, ढोलताशाचा निनाद, बेधुंद होऊन नाचणारे युवक, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले बौद्ध उपासक उपासिका, सर्वत्र निळ्या रंगाची उधळण ‘जयभीम’चा जयघोष करीत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती मोठ्या हर्षोउल्लासात साजरी करण्यात आली. आकर्षक सजावट केलेल्या वाहनांवर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमा ठेऊन ढोलताशाच्या निनादात शहरातून मिरवणुक काढण्यात आली. या वेळी ‘जयभीम’ च्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते. दरम्यान शुक्रवारी १४ एप्रिलला बुलडाणा शहरासह चिखली, देऊळगावराजा, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, खामगाव, मोताळा, नांदुरा, जळगाव जामोद, मलकापूर यासह अनेक लहान मोठ्या शहरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. 
 
शहरात संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान गांधी भवन येथून निघालेल्या मिरवणुकीला जयंती उत्सव उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक इंगळे, कुणाल पैठणकर, अॅड. गणेश इंगळे, विजय खंडागळे, अशोक दाभाडे प्रा. डी. आर. माळी यांनी निळा झेंडा दाखवून सुरूवात केली. शहरासह सुंदरखेड, विजय नगर, शांती नगर, मिलींद नगर, सावित्रीबाई फुले नगर, भीम नगर, आंबेडकर नगर, इंदिरा नगर यासह विविध वॉर्डातील भीम रथ या मिरवणुकीत सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या मिरवणुकीतील प्रत्येक रथा समोर तरुण वर्ग बेधुंद होऊन ढोल ताशाच्या तालावर नृत्य करीत होते. तर पाठोपाठ शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या महिला उपासिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारीत गीते गात होत्या. आपापल्या वॉर्डातील नागरिकांनी वाहनावर विविध आकर्षक देखावे सादर करून बुलडाणेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. 
 
एकापेक्षा एक देखावे मिरवणुकीमध्ये सादर करण्यात आले होते. यावेळी चौकाचौकात शुभेच्छांचे डिजीटल बोर्ड स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. लेझीम पथक, लाठ्या काठ्याचे प्रात्यक्षिक आणि इतर चित्त थरारक प्रात्यक्षिके या मिरवणुकीत सादर करण्यात आली. मिरवणुकीत सर्वत्र ‘जयभीम’चा जयघोष घुमत होता. गांधी भवन येथून सुरूवात झालेली भीम जयंतीची मिरवणुक आठवडी बाजार, सराफा गल्ली, संगम चौक, तहसील चौक, स्टेट बँक चौक, यासह शहराच्या प्रमुख मार्गावरून रात्री उशिरा पर्यंत चालली. 
 
या मिरवणुकीत सर्व समाजातील नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. तत्पूर्वी आज सकाळीच शहरातील वॉर्डा-वॉर्डात बौद्ध उपासक, उपासिकांनी बुद्ध विहारात त्रिशरण पंचशील ग्रहण केले. भीमजयंती निमित्त वॉर्डा वॉर्डात विविध कार्यक्रम, स्पर्धा घेतल्या. ठिकठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करून त्रिशरण पंचशील ग्रहण केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या मिरवणुकीत जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक इंगळे, अशोक दाभाडे, विद्यासागर अंभोरे, सुरेश चव्हाण, विजय खंडागळे, चंद्रकांत खरे, विजय राऊत, भिकाजी मेढे, दिपक मनवर, दिपक मोरे, कडूबा बनसोडे यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले होते. दरम्यान या मिरवणुकी दरम्यान अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 
 
फटाक्याची आतिषबाजी करून केले भीम जन्माचे स्वागत : भीमजयंतीच्यापूर्व संध्येला म्हणजे गुरुवारी १३ एप्रिल रोजी रात्री बाराचे ठोके पडल्यानंतर जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर फटाक्याची आतषबाजी करून भीम जन्माचे स्वागत करण्यात आले. या वेळी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आकाश न्हाऊन निघाले होते. 
 
जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भीम जयंती निमित्त मोटार सायकल रॅली काढण्यात आली. सर्वप्रथम मलकापूर रोडवरील भगवान गौतम बुद्ध, ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रॅलीला सुरुवात केली. त्यानंतर जयस्तंभ चौक, बाजार लाईन, कारंजा चौक, सर्क्युलर रोड, विष्णु वाडी, गजानन महाराज मंदिर, बसस्थानक, संगम चौकातून आल्यानंतर जयस्तंभ चौक येथे रॅलीचा समारोप केला. या रॅलीत शहरातील भीमसैनिक दुचाकींसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुक्रवारी शहरातून दुचाकी फेरी काढण्यात आली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...