आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटांचे ‘डाव’ फसले, नेत्यांपुढे मतांचा ‘पेच’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सध्या चांगलाचा ज्वर चढला आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी मतदारांना आकर्षित करण्याचा सपाटा सध्या उमेदवार कार्यकर्त्यांकडून सुरू झाला आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रमुख पक्ष स्थानिक नेत्यांसाठीही प्रतिष्ठेची ठरल्यामुळे नगराध्यक्षपदावर नगरसेवक म्हणून निवडून आणण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जात आहे. यासाठी जात, चारित्र्य, असंतुष्टावरील अन्याय, पक्षाची कामे आदी मतदारांना पटवून सांगण्याचे डावपेच आखले जात आहे. नोटाबंदीमुळे प्रथमच या निवडणुकीत टाकले जाणारे नोटांचे ‘डाव’ फसल्यामुळे पैशावर निवडणुका जिंकणाऱ्या नेत्यांपुढे ‘पेच’ निर्माण झाला आहे.
आतापर्यंतच्या राज्य केंद्र शासनाकडून लोकहिताच्या खोऱ्याने योजना राबविण्यात आल्या. खोक्याने पैसे या योजनांवर खर्च करण्यात आले. परंतु ग्रामीण भागासह तालुक्याच्या ठिकाणच्या जनसामान्याच्या नशिबी ना धड रस्ता आला ना रोग बरा करणारी आरोग्य यंत्रणा. घराजवळची खचलेली नाली, दलित वस्तीतील नुकताच बांधलेला उखडलेला रस्ता, तुंबणाऱ्या गटारातील डासांच्या सोंडेने हैराण झालेला जनसामान्य, पाण्यांच्या थेंबाची रात्रभर वाट पाहणारी पालिकेच्या नळाखालील भांडी, शहरात पदपथच अस्तित्वात नसल्याने बाजारातून सापासारखे आडवळणे घेत घराचा रस्ता शोधणारे रहिवासी , गल्लीबोळातील फुटलेल्या पथदिव्याच्या अंधारात गिट्टीची ठेच खाऊन नगरसेवकाला शिव्याशाप देणारा सामान्य मतदार, भूमाफिया-बिल्डरांना संरक्षण देऊन तणफुगीसारखी फुगलेली परंतु सुविधा मिळाल्याने हाल भोगणारा मध्यमवर्गीय असेच चित्र पालिका निवडणुका असलेल्या जिल्ह्यातील नऊ तालुक्यांच्या ठिकाणी दिसून येत आहे.

आश्वासनांची खैरात नेत्यांच्या सभा एेकून-ऐकून मुलभूत सोयी सुविधांची वाट पाहणाऱ्या अनेक पिढ्या डास, गटार, डुकरे, खडे, अपघातांच्या सोबतीने मोठ्या झाल्या. काही वार्धक्याकडे झुकल्या तर काही खपून मातीतही गेल्या. खुर्ची, पद, प्रतिष्ठा, ठेके कमिशन मिळवण्यात सत्ता खपल्या. नेत्याची सायकल जाऊन चारचाकी आली. घरकुल, शौचालय, हातगाडी लावण्यासाठी जागा मिळवण्यात सामान्य पालिकेच्या पायऱ्या झिजवत राहिला. त्याच समस्या, तीच आश्वासने, तोच भ्रष्टाचार पाहूनपाहून नजरा थकल्या अन आता बोथटही झाल्या. यापुर्वी सत्ता मिळवण्यासाठी जातीचे गणित, आश्वासनाच्या पुंग्या वाजवून सत्तेची समीकरणे मांडण्यात आली ती यशवीही झाली. यावेळच्या पालिका निवडणुकीतही तेच राजकीय डावपेच मांडले जात आहे. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांनंतर यावेळी वैचारिक, शैक्षणिक दर्जा सुधारलेल्या मतदारांना स्वच्छ चारित्र्याचा, दूरदर्शी, अभ्यासू जनप्रतिनिधी लागतो याचा प्रथमच साक्षात्कार सर्वच राजकीय पक्षांना झाला. राजकीय पटलावर होणारा हा सकारात्मक बदल पालिका निवडणुकीसाठीही लागू पडला. त्यामुळे नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाचे उमेदवार शोधताना अशी ‘माणसं’ शोधण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांना मोठीच कसरत करावी लागली. चेहरे शोधूनही सापडत नाही म्हणून स्वपक्षातील मलीन चहरा बसवून दुसऱ्या पक्षातील असंतुष्टांना आपल्या तंबूत घेऊन उमेदवारी देण्याचे धैर्य पक्षांना यावेळी दाखवावे लागले. त्यांना िनवडून आणण्यासाठी नेहमीप्रमाणे जातीचे कार्ड प्राथमिकतेने दाखविण्यात येत आहे. त्यानंतर उमेदवाराचे स्वच्छ चारित्र्य, ज्ञान, शिक्षण, समाजिक जाणीवेचा असलेला ‘बायोडाटा’चे कार्यकर्त्यांकडून मतदारांमध्ये पठन केले जात आहे. पक्षाने केलेल्या परंतु कमिशनमुळे निकृष्ठ झालेल्या कामाचेही मॉडेल सामान्य मतदारांसमोर ठेवले जात आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून भविष्यातील विकासकामाचा अजेंडा, सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी आपण काय करणार आहोत हे पटवून दिले जात आहे. नोटाबंदीमुळे विकल्या जाणाऱ्या मतदारांना वश करण्यासाठीही नोटा फारशा काम करू शकत नसल्याचे चित्र शहरांमध्ये दिसून येत आहे. नेते कार्यकर्त्यांच्या विशिष्ट फळीतच हा खर्च होऊन उवर्ररित मतदारांना आकर्षित करण्यासाठी डावपेच आखले जात आहे. झोपडपट्टीतील विकास, घरकुल, रस्ता, नालीचे बांधकाम, स्वच्छतागृह करण्याचे आश्वासन दिले जात आहे. काही पक्षांना विकास तळागाळात पोहचविण्यासाठी पालिकेमध्ये सत्ता हवी आहे तर काही पक्षांना अस्तीत्व टिकवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सध्या बड्या नेत्यांच्या सभा आयोजित करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजकीयसह वैयक्तिक शिंतोडे उडविण्याचेही काम कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी कधीही फटकणारे नेते प्रचार सभेसाठी सादर केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक यापुर्वीच्या निवडणुकांपेक्षा वेगळी ठरणार असून निवडणुकीनंतर पक्षाचे डावपेचही किती तगडे किती कमकुवत होते हे दिसून येणार आहे.

सुजाण मतदारांचे फक्त निरीक्षण : पालिकानिवडणुकीत आतापर्यंत आश्वासनाने तोंड पोळलेला सुजाण मतदार क्षमता असलेला उमेदवार शोधत आहे. लोकाभिमुख, विकासाची नाडी, जनसामान्यांची दुखणी जाणणाऱ्या उमेदवाराला मतदारांकडून प्राधान्य देण्यात येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. दारादारात जाऊन मतांचा जोगवा मागणाऱ्या कार्यकर्त्या यांच्या हातात यावेळी नेहमीप्रमाणे नोटा दिसत नसल्यामुळे ही निवडणूक प्रथमच खऱ्या अर्थाने विकास, स्वच्छ राजकारण चारित्र्याच्या मापदंडावर होणार असल्याचे दिसून येत आहे.

सुजाण मतदारांचे फक्त निरीक्षण
पालिका निवडणुकीत आतापर्यंत आश्वासनाने तोंड पोळलेला सुजाण मतदार क्षमता असलेला उमेदवार शोधत आहे. लोकाभिमुख, विकासाची नाडी, जनसामान्यांची दुखणी जाणणाऱ्या उमेदवाराला मतदारांकडून प्राधान्य देण्यात येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. दारादारात जाऊन मतांचा जोगवा मागणाऱ्या कार्यकर्त्या यांच्या हातात यावेळी नेहमीप्रमाणे नोटा दिसत नसल्यामुळे ही निवडणूक प्रथमच खऱ्या अर्थाने विकास, स्वच्छ राजकारण चारित्र्यच्या मापदंडावर होणार असल्याचे दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...