आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव समाजाने ठेवण्याची अावश्यकता’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शेतकरी सध्या मरणाच्या दारात उभा असून समाजाने याची जाण ठेवली नाही तर शेती आणि शेतकरी नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी चळवळीतील नेते गजानन अमदाबादकर कारंजा लाड यांनी केले. समता पर्वातील व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. प्रमिलाताई आेक सभागृहात बुधवारी सायंकाळी झालेल्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक डॉ. पुरुषोत्तम तायडे होते. मार्तंडराव माळी, प्रा. डॉ. संतोष हुशे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. के. एस. घोरपडे व्यासपीठावर होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
 
आई वडिलानंतर शेतकरी आपले दैवत आहे. आपल्या घासातला घास तो देतो त्याच्यासाठी आमची बांधिलकी आहे की नाही हे संस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याकडून मिळाल्याची आठवण अमदाबादकर यांनी १९६५ चा प्रसंग सांगून करुन दिली. शेतीचा विषय सर्व समाजाने समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी पुढे आले पाहिजे. कोणताही एक घटक शेतकऱ्यांचे दु:ख दूर सारू शकत नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे गजानन अमदाबादकर यांनी सांगितले. 

‘शेतकऱ्यांची दशा, दिशा आणि उपाय’या विषयावरील व्याख्यानात त्यांनी शेतकरी किती अडचण सापडला आहे याविषयी सांगितले. सुरुवातीला, डॉ. एम. आर. इंगळे, डॉ. संदीप भोवते, सिद्धार्थ देवगिरीकर, अविनाश पाटील, संदीप महल्ले, मनोज आेेहेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रशांत बुले यांनी केले. वक्त्यांच्या परिचय शिवाजी भोसले यांनी करुन दिला. 
 
आज रसिका बोरकर हिचे गायन 
गुरुवारी सायंकाळी लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर पंजाबराव वानखेडे नागपूर यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर रसिका बोरकर आणि संचाचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...