आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्ह्यात पूर; तिघे बेपत्ता, धरणाचे दरवाजे उघडल्याने काही गावांचा संपर्क तुटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अकोला जिल्ह्यातील उमा, निर्गुणा, काटेपूर्णा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नद्यांना पूर आला असून त्यात बाळापूर, अकोट व तेल्हारा तालुक्यांतील तिघे बेपत्ता
झाले आहेत.

पुरामुळे पूर्णा नदीच्या पुलावरून जवळपास १४ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे अकोट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तळेगाव डवला व तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, जुनी उमरी, पिवंदळ, धामणा व अंदुरा अशा आठ गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. येवता, निमकर्दा व बटवाडीत पावसाने नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील ४८ तासांत आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
जळगाव जिल्ह्यात महिला वाहून गेली
जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू हाेती. पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. हतनूर धरणाचे ४१ दरवाजे एक मीटरने उघडून विसर्ग केला जात होता. ऐनपूर येथील श्यामाबाई राजाराम महाजन (वय ७०) या वृद्ध महिलेचा बुधवारी तापी नदीच्या पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. ग्रामस्थांनी महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. रावेर तालुक्यातील अजनाड, विटवे, निंबोल, ऐनपूर या गावांचे रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला होता.