आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जामोदमध्ये स्मार्ट सिटी संकल्पनेचा उडाला फज्जा, शहराला बकाल स्वरूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव जामोद येथे रस्त्याच्या लगत उभी केलेले जड वाहतुकीची वाहने. - Divya Marathi
जळगाव जामोद येथे रस्त्याच्या लगत उभी केलेले जड वाहतुकीची वाहने.
जळगाव जामोद- शहरात जागोजागी झालेले अतिक्रमण, तसेच रखडलेली विकासकामे कामाचा सुमार दर्जा, यामुळे शहर स्मार्ट सिटी संकल्पनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य चौकात जड वाहने उभी राहत असल्याने हे चौक पार्किंग स्थळ बनले आहे. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 
 
शहरात वर्ग नगरपालिका अस्तित्वात आहे. सन २०१४ मध्ये नगरपालिकेत सत्तांतर होऊन नगराध्यक्षपदी रामदास बंबटकार विराजमान झाले होते. मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी शहर स्मार्ट सिटी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार विकास कामांची आखणी करत त्यांनी सुमारे ३२ कोटींचा निधी शासनाकडून मिळवला. या कामात सर्वप्रथम ड्रेनेज सिस्टिम बरोबर करण्याचे काम हाती घेण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. 

मात्र दर्जाहीन विकास कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी पालिकेकडे आल्यानंतर त्या तक्रारीवर विशेष कोणतीच कारवाई करण्यात आल्याने ती कामे दर्जाहीन स्थितीत पूर्णत्वास नेण्यात आली. नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांना नळयोजनेच्या पाइपलाइनसाठी खोदण्यात आल्याने पूर्वीप्रमाणे स्थिती झाली आहे. रस्ते खोदल्यानंतर डागडुगीची जबाबदारी पालिकेची असते. मात्र अद्यापही या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. शहरात वाढते अतिक्रमण विकास कामात मोठा अडसर ठरत आहे. जागोजागी झालेल्या अतिक्रमणामुळे लक्षावधींची विकासकामे रखडलेली आहेत. काही ठिकाणी तर अतिक्रमणामुळे अर्धवट कामे सोडून देण्यात आली. यात त्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे सौजन्य नगरपालिकेने दाखवले नाही. त्यामुळे शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. बसस्थानक परिसरात खासगी वाहन धारकांनी रस्त्यांच्या कडेला वाहनतळ केल्याने एसटी चालकांना स्थानकाबाहेर आपली बस काढताना तारेवरची कसरत करावी लागते.
 
 बस स्थानक परिसरात नेहमीच ट्रॅफिक जाम होत असते तरी सुद्धा वाहतूक शाखा याकडे दुर्लक्ष करत आहे. शहरातील महत्वपूर्ण असलेल्या दुर्गा चौकाचे सुशोभिकरण करण्यासाठी अंदाजे एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. केवळ चौकातील रस्त्याची बांधणी केले म्हणजे सौंदर्यीकरण झाले की काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. येथे ही अतिक्रमणे पूर्ववत झालेली आहेत. रस्त्याच्या कडेला फळ विक्रेते, हातगाडी, फेरीवाले यांनी आपली दुकाने थाटली आहेत. जड वाहनांमुळे चौकाचे पार्किंग स्थळ बनले आहे. शहरात दुर्गा चौक शहराच्या मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत. ते पोलिस स्टेशनला जोडण्यात आले आहे. रस्त्यात निर्माण होणारी रहदारीची कोंडी दिसत असली, तरी पोलिस प्रशासन मौन बाळगून आहे. एकंदरित शहरातील मुख्य रस्त्यावरील विकास कामात अडसर ठरणारे अतिक्रमणे काढून दर्जेदार विकासकामे केली नाही, तर आमदार डॉ. संजय कुटे यांच्या कल्पनेतून साकारणाऱ्या स्मार्ट सिटी संकल्पनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. 
 
पूर्वी पेक्षाही आता झाले जास्त अतिक्रमण 
महिना भरापूर्वी अतिक्रमण हटावची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत धनदांडग्यांची तसेच राजकीय वरदहस्त प्राप्तांचे पक्की अतिक्रमणे अद्यापही कायम आहेत. या मोहिमेत दुकाने हटवल्यानंतर झालेल्या मोकळ्या जागेत फळ विक्रेते, हातगाडी वाल्यांनी अनधिकृत ताबा केल्यामुळे आता पूर्वीपेक्षा जास्त अतिक्रमण झाले आहे. 
 
शाळेच्या रस्त्यावर विद्यार्थ्यांची कोंडी 
दुर्गा चौकाच्या आजूबाजूच्या परिसरात डॉ. आंबेडकर विद्यालय, दी न्यू ईरा हायस्कूल, जि. प. हायस्कूल, न. प. मराठी सावित्रीबाई कन्या प्रायमरी शाळा श्रीपाद कोल्हटकर कॉलेज यांच्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला जड वाहने, प्रवासी वाहने, ऑटो रिक्षा उभी राहत असल्याने शाळा सुटण्याच्या वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. 
 
बातम्या आणखी आहेत...