अकोला - पत्नीला स्वयंपाक येत नाही, या कारणावरून भांडण झाल्यानंतर रात्री अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याने पत्नीचा मृत्यू झाला होता. ही घटना मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथे दोन वर्षापूर्वी घडली होती. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश (पहिले) आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयात झाली. यात न्यायालयाने पतीला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लियाकत शहा शहादत शहा (वय ३२ रा. सिरसो)असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दर्यापूर तालुक्यातील बाभळी येथील रेशमा परवीनसोबत लियाकत याचा विवाह झाला होता. विवाहानंतर तीन महिन्यांनी लियाकत शहा याने पत्नी रेशमा परवीन सोबत २६ जून २०१५ रोजी संध्याकाळी चूल पेटवता येत नाही, यावरून वाद घातला होता. त्यानंतर दोघेही झोपले होते. रात्री वाजताच्या सुमारास लियाकत शहा याने घरातच तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. गावकऱ्यांनी घरात जाण्याचा प्रयत्न केला असता लियाकत अली हा दारातच दंडुका घेऊन बसला होता. त्याने कुणालाही घरात येऊ दिले नाही. त्याने १२ तास रेशमा परवीन हिला भाजलेल्या अवस्थेत घरातच ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी परवीनची आई आली असता आरोपीने तिलाही घरात येऊ दिले नाही. नंतर तिची आई नातेवाईकांना सोबत घेऊन घरात आली. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र जुलै रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पती लियाकत अली याच्याविरुद्ध भादंवी ३०२ चा गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले. घराशेजारी राहणारा आरोपीचा काका बरकतशहा फितूर झाला. न्यायालयाने आरोपी पतीला दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा एक हजार रुपये दंड, दंड भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. आर.आर. देशपांडे यांनी काम पाहिले.
पहिल्या बयानात पतीने जाळले
घटनेचातपास मूर्तिजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस.के. राठोड यांनी केला. रेशमा परवीनला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहिल्यांदा एस.के. राठोड यांनी तिचे बयाण घेतले. त्यात पतीने अंगावर रॉकेल टाकून जाळून मारले आपण मदतीसाठी याचना करत होतो. मात्र त्याने तू आता वाचणार नाही. त्यामुळे तुला नेऊन फायदा नाही असे पतीने म्हटले होते.
नायब तहसीलदारांचे बयाण वादग्रस्त : अशा प्रकरणात मृत्यूपूर्व बयाण नायब तहसीलदार घेतात. मात्र नायब तहसीलदाराने नोंदवलेल्या बयाणात रेशमा परवीन हिने स्वत:च रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेतल्याचा उल्लेख २७ तारखेला घेतलेल्या बयाणात केला आहे. हे बयाण वादग्रस्त झाले. या बयानामध्ये साधर्म्य नसल्याने पोलिस उपनिरीक्षक राठोड यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना कळवले. त्यांनी पुन्हा व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये बयाण घेण्याचे सांगितले असता आपण तसे बोललोच नसल्याचे रेशमाने पोलिसांना सांगितले.