आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकअदालतीने दोन दिवसांत सोडवले तंटे, आता अकोट तालुक्यात सुरु आहे न्यायदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गाव-खेड्यांतील नागरिकांना कोर्टाची पायरी चढावी लागू नये. किंबहूना वारंवार दिल्या जाणाऱ्या तारखांमुळे वेळ आणि पैशाचा चुराडा होऊ नये म्हणून जिल्हा भ्रमण करीत असलेल्या फिरत्या लोक अदालतीने पहिल्या दोन दिवसांतच डझनभरापेक्षा अधिक खटल्यांचा निकाल लावला आहे. 
 
यामुळे लाखो रुपयांचा महसूल शासनदरबारी जमा झाला असून वर्षानुवर्षे खटला लढणाऱ्या त्या कुटुंबीयांनाही हायसे वाटले अाहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे पर्व सुरु आहे. त्यामुळे निकाल लागलेल्या प्रकरणातील याचिकाकर्ते आणि ज्यांच्या विरोधात खटला दाखल केला गेला होता, ते अशा दोन्ही गटांना बाप्पा पावला आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना त्यांच्या सोईनुसार विधी सहाय्य मिळावे म्हणून शुक्रवारपासून जिल्ह्यात ‘फिरते न्यायालय’ दाखल झाले आहे. या न्यायालयाचा मुक्काम महिनाभर राहणार असून या काळात न्यायाधीश एस. एस. हिरुरकर चक्क लोकांच्या दारी पोहोचून न्यायनिवाडा करणार आहे. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते या न्यायालयाचा प्रारंभ झाला. त्यानंतर पहिल्या दिवशी बोरगाव मंजू येथील ग्रामपंचायत कार्यालयात न्यायालय भरविण्यात आले. 
 
दुसऱ्या दिवशी अकोला पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात सुनावणी घेतली गेली. ती आटोपल्यानंतर फिरती लोकअदालत अकोटकडे रवाना झाली आहे. तेथून पुढे तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शिटाकळी मुर्तीजापूर या तालुक्यांतही ती भरवली जाईल. या अदालतीद्वारे दीड हजारांवर प्रकरणांचा न्यायनिवाडा केला जाईल, असे नियोजन करण्यात आले आहे. 
 
यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रभारी सचिव न्या. एन. जी. शुक्ल, अधीक्षक आर. एम. निकुंभ, इतर कर्मचारी एस. पी. टाकळीकर, कुणाल पांडे, शहाबाज खान, जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी आदी अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...