आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ आरोपींवर कठोर कारवाईसाठी जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - बुलडाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा तसेच लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे येथील प्रकरणातील आरोपींना अटक करून पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे, दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करण्यात यावे, शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, संविधानाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी आज १६ जून रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील विविध संघटनांनी लक्षणीय सहभाग घेतला. 
 
नियोजीत वेळेपेक्षा दोन तास उशिराने या मोर्चाची सुरुवात स्थानिक गांधी भवन येथून करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी केले. मोर्चात जिल्हाभरातील शेकडो मागासवर्गीय बांधव सहभागी झाले होते. त्यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. हा मोर्चा जयस्तंभ चौक, बाजार लाईन, सराफा लाईन, कारंजा चौक, भोंडे चौक, स्टेट बँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चा दरम्यान आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, अशा घोषणा देवून मोर्चेकऱ्यांनी शहर दणाणून सोडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर करण्यात आले. 

यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप, बाबुराव माने, अशोक कानडे, डॉ. शांताराम कारंडे, डॉ. रोहिदास वाघमारे, राजन शिंदे शांताराम कदम यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील चर्मकार समाजातील महिलेला जबर मारहाण करून तिला विवस्त्र करण्यात आले. त्यानंतर तिची गावातून धिंड काढण्यात आली. ही घटना समाजाला कलंकित करणारी आहे. तर लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे येथील त्र्यंबके कुटूंबाला जबर मारहाण करून त्यांच्या शेतात अतिक्रमण करण्यात आले. अलिकडच्या काळात पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात मागासवर्गीयावर दिवसेंदिवस अत्याचारात वाढ होत आहे. त्यामुळे या सर्व घटनांचा निषेध करून या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, संविधानाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवरील खोटे गुन्हे रद्द करावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यात यावा, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात ज्ञानेश्वर वरपे, चंद्रप्रकाश देगलुरकर, अशोक लहाने, मयुर कांबळे, ईश्वर ताथवडे, दिपचंद जयस्वार, अच्युतराव भोईटे, लक्ष्मणराव घुमरे, संजय खामकर, अशांत वानखेडे, दामोदर बिडवे, कैलास सुखदाने, बाबासाहेब जाधव, कुणाल पैठणकर, यांच्यासह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. 

महिलांची लक्षणीय उपस्थिती 
विविध मागण्यांसाठी निघालेल्या या मोर्चात पावसाची पर्वा करता सर्व मागासवर्गीय समाजातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त 
मोर्चा दरम्यान कुठलीही अनुचित घटना होवू नये, यासाठी शहर पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील चौकाचौकात पोलिस तैनात करण्यात आले होते. 

अनेक संघटनांचा सहभाग 
या मोर्चात राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, समतेचे निळे वादळ, बारा बलुतेदार महासंघ, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, भीमशक्ती संघटना, लहुजी शक्ती सेना, कास्ट्राईब परिवहन कर्मचारी संघटना, भारत मुक्ती मोर्चा, मातंग सेवा महासंघ, भटके विमुक्त फ्रंट, एकलव्य संघटना, अनुसूचित जाती जमाती परिसंघ, आदिवासी कर्मचारी संघटना, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, समता सैनिक दल आदि संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
बातम्या आणखी आहेत...