आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाडतविना सुरू झाली बाजार समिती, पहिल्याच दिवशी झाली सोयाबीनची विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अाडत देण्यास नकार देत व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या अहसकार आंदोलनाला खरेदी-विक्रीचा थेट व्यवहार सुरू करून सोमवारी उत्तर देण्यात आले. बाजार समितीच्या या कृतीमुळेे महिनाभरापासून सुरू असलेल्या बंदची कोंडी फुटली असून, सोमवार या पहिल्या दिवशी सोयाबीनच्या ३० कट्ट्यांची खरेदी-विक्री केली गेली.

शेतकऱ्यांना आडतमुक्त करण्यासाठी शासनाने या वर्षीपासून १९६३ च्या बाजार समिती अधिनियमात सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार अाडतीची रक्कम शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडूनच घेण्याची तरतूद करण्यात आहे. कायद्यातील ही सुधारणा एक जुलैपासून लागू करण्यात आली. मात्र, ती अन्यायपूर्ण असल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी त्यावर बहिष्कार घातला होता. परिणामी महिनाभरापासून बाजार समितीचे संपूर्ण व्यवहार ठप्प पडले आहेत. ते पूर्ववत व्हावे, यासाठी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, वारंवार सूचना देऊनही व्यापाऱ्यांनी त्यांची भूमिका सोडली नाही. त्यामुळे सोमवारपासून पर्यायी व्यवस्था उभी करून देत बाजार समितीचे व्यवहार सुरू करण्यात आले.

तत्पूर्वी बाजार समितीच्या संचालकांची बैठक घेऊन त्यात शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याची उपाययोजना करण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर सभापती शिरीष धोत्रे यांनी पुढाकार घेत पर्यायी व्यवस्था उभी केली. खरेदीदारांनी थेट बाजार समितीत पोहोचून हवे असलेले धान्य खरेदी करावे, अशी ही व्यवस्था आहे. त्यानुसार सोमवारी एका शेतकऱ्याने ३० कट्टे (१५ क्विंटल) सोयाबीनची विक्री केली. खरेदीदार विक्रेता थेट समोरासमोर असल्याने कोणत्याही प्रकारची अाडत द्यावी लागली नाही. खरेदीदाराने लोडिंगची मजुरी दिली तर शेतकऱ्याने त्याचा माल अनलोडींग करण्यासाठी लागणाऱ्या मजुरीचे पैसे मोजले. अशाप्रकारे मागील महिनाभरापासून बंद असलेला बाजार सोमवारी पूर्ववत झाला.

दरम्यान, खरेदी प्रक्रियेत असहकार पुकारल्याची व्यापाऱ्यांची कृती बेकायदेशीर असल्यामुळे समिती प्रशासनाने सुमारे ८० व्यापाऱ्यांना लायसन्स रद्द करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. या नोटीसना उत्तरे देण्याची शनिवार ३० जुलै ही शेवटची तारीख होती. त्यानुसार बहुतेक व्यापाऱ्यांनी त्यांचे स्पष्टीकरणही सादर केले. या स्पष्टीकरणाचा अभ्यास करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा निर्णय अद्याप राखून ठेवण्यात आला आहे.

दुसरीकडे नोटीस बजावण्याचे समितीने उचललेले पाऊल हे व्यापाऱ्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणारे असून त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केल्याचे व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी वसंत बाछुका यांनी सांगितले.

... तोपर्यंत शेतकऱ्यांची गैरसोय टळली
^व्यापाऱ्यांच्याअसहकारामुळेशेतकऱ्यांची अडचण झाली होती. मागील महिन्यातील काही दिवस पावसाचे असल्याने फारसा माल विक्रीस आणला जात नव्हता. मात्र, आता तेही जेरीस आले आहेत. त्यामुळे थेट खरेदी-विक्री अशी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांच्या भूमिकेत बदल होईपर्यंत ही व्यवस्था सुरू राहील. दरम्यान या निर्णयाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थाने आडतमुक्त बाजार सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.'' शिरीषधोत्रे, सभापती, बाजार समिती, अकोला.
बातम्या आणखी आहेत...