आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वत्र ‘२६’चा पॅटर्न राबवा, शाळा क्रमांक २६ ला दिली जिल्हाधिकाऱ्यांनी भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मनपामराठी मुलांची शाळा क्रमांक २६ चा पॅटर्न इतर मनपा तसेच जिल्हा परिषद शाळांनीही राबवावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली.
सप्टेंबरला मनपा शाळा क्रमांक २६ ला दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा डबघाईस येत आहेत. लोकप्रतिनिधी, शिक्षक आणि नागरिकांनी पुढाकार घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळाही सोयीसुविधांसोबत शैक्षणिक दर्जाही वाढवू शकतात, ही बाब शाळा क्रमांक २६ ने सिद्ध केली आहे.
आपण केवळ चुकीच्या बाबींकडे लक्ष केंद्रित करतो, त्याबद्दल चर्चाही करतो. परंतु, चांगल्या गोष्टीही समाजात घडतात. शाळा क्रमांक २६ चे उदाहरण यासाठी पुरेसे आहे. परंतु, अद्यापही विद्यार्थ्यांना पुरेपूर सुविधा मिळालेल्या नाहीत. यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू. मनपाने प्रस्ताव पाठवल्यास वर्गखोल्या पाच संगणकांसाठी डीपीडीसीतून निधी मंजूर केला जाईल, अशी ग्वाहीही
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली असून, शाळा सुधार समिती, नगरसेवक दिलीप देशमुख आणि शाळेतील संपूर्ण शिक्षकांचे यात योगदान आहे. त्यांच्यामुळेच हे परिवर्तन घडले आहे. हाच कित्ता इतर शाळांनीही गिरवावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले, तर प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या गरजा ऐकून घेतल्या. यात खेळाच्या साहित्यापर्यंतच्या वस्तूंचा समावेश होता. यापैकी काही फुटबॉल संच आजच्या आजच तुमच्यापर्यंत पोहोचतील, असे अभिवचन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. प्रास्ताविक मनोज बोचरे यांनी केले. सूत्रसंचालन अपर्णा ढोरे यांनी केले. या वेळी नगरसेवक दिलीप देशमुख, मुख्याध्यापक राजीव अवधूत आदी उपस्थित होते.

मला खूप शाल मिळतात; तुमचा सत्कार महत्त्वाचा
दिव्य मराठीच्या महाअभियानाचे कौतुक
"दिव्यमराठी'ने महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ साठी सुरू केलेल्या महाअभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दहावीतील विद्यार्थ्यांसाठी प्रभात किड्स, मायबोली कोचिंग क्लासेस, श्री रेणुका माता मित्र मंडळ आदींनी पुढाकार घेतला. या सर्व संस्थांचे आणि "दिव्य मराठी'च्या महाअभियानाचे कौतुक करून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ‘मिशन २६’ बाबत माहिती जाणून घेतली. तसेच आतापर्यंत या अभियानात राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.

महापालिका शाळेने स्वत:चे मिशन २६ राबवावे
मनपाशाळेत प्रभात किड्स आणि मायबोली कोचिंग क्लासच्या वतीने ‘मिशन २६’ राबवल्या जात आहे. हे मिशन दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु, याच मिशनसोबत शाळेने स्वत:चे ‘मिशन २६’ राबवावे. यात २६ विद्यार्थ्यांची निवड करा. जे कलागुण विद्यार्थ्यांमध्ये आहेत, त्यांना हेरून त्यांना चालना देण्यासाठी विविध क्षेत्रात भविष्यात पारंगत होणाऱ्या २६ विद्यार्थ्यांच्या संबंधित शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी मी स्वत: पुढाकार घेईन, असे अभिवचनही जी. श्रीकांत यांनी दिले.

जिल्हाधिकारी रमले चिमुकल्यांमध्ये
जिल्हाधिकारीजी. श्रीकांत यांनी आपल्या व्यस्त वेळेतून तब्बल दोन तास विद्यार्थ्यांसोबत घालवले. प्रत्येक वर्गाला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी घेतली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध वर्गातील विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी, मराठी या विषयाचे प्रश्न विचारले, तर केजी-१ च्या वर्गात त्यांनी अधिक वेळ घालवून ते चिमुकल्यांमध्ये रमले. विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला जाणार होता. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कारापूर्वीच मला खूप शाल मिळतात. तुम्ही शाळा चांगली ठेवण्यासाठी खूप मदत करत आहात, त्यामुळे माझ्यापेक्षा तुमचा सत्कार महत्त्वाचा आहे, असे सांगून त्यांनी समितीच्या अध्यक्षांच्या सत्कारासाठी शालही उचलली. परंतु, अखेर समितीच्या आग्रहासाठी त्यांना हा सत्कार स्वीकारावा लागला.