आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारी खुले नाट्यगृहात 45 वे मूर्ख संमेलन, मनपा निवडणूक, नोटाबंदी यंदाचे मुख्य आकर्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोल्यातील रसिकांच्या पुढाकाराने गेली ४५ वर्षे धुळवडीच्या दिवशी ‘मूर्ख संमेलन’ आयोजित केले आहे. राज्यातील आगळावेगळा असा कार्यक्रम असून मूर्ख संमेलनाची सुवर्ण जयंतीकडे वाटचाल सुरू झाली आहे. सोमवार, १३ मार्च रोजी सायंकाळी वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात संमेलन होणार असून, नुकतीच झालेली मनपा निवडणूक, नोटाबंदी आदी विषय मुख्यत्वे राहतील, अशी माहिती मुर्खाधिराज विकासचंद्र शर्मा यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. 
 
डॉ. प्रभुदयाल शर्मा यांनी ज्येष्ठ पत्रकार रामकिशोर श्रीवास यांना सोबत घेऊन धुलीवंदनाच्या दिवशी मूर्ख संमेलनाची मुहुर्तमेढ रोवली. सुरुवातीला कॉटन मार्केटमध्ये संमेलन होत असे. ‘अभिनव विधानसभा’ हा सर्वांच्या आकर्षणाचा विषय राहायचा. हास्याचे फव्वारे कार्यक्रमात उडत असतं.
 
माजी खासदार असगर हुसेन, भू. ना. मुखर्जी, बाबा कोथळकर, शंकरराव खंडारे, कामगार नेते मधुकर उतखडे, आेमप्रकाश मिश्रा, मामा पांडे, मोहनलाल छावछरिया, पन्नालालजी शर्मा, बळीराम चापले, बाजीराव पाटील, डोंगरे मामा, ब. स. ताकवाले, बाबासाहेब उदासी, लक्ष्मणसिंह जाजोरिया, रामेश्वरलाल अग्रवाल आदींचा सहभाग त्यात असायचा. 
 
 
डॉ. प्रभुदयाल शर्मा यांच्या निवृत्तीनंतर २००५ पासून विकास शर्मा मुर्खाधिराजाच्या भूमिकेत असतात. सिटी कोतवालीच्या मागील भागातून मिरवणुकीने त्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होत असते. यावेळी मतदान आणि लताबाईने लढवलेली निवडणूक ही संकल्पना घेऊन शाहीर वसंतदादा मानवटकर कला सादर करणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर विजय अग्रवाल यांच्यासह नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 
 शहरातील विविध क्षेत्रातील कलावंतांचा त्यात सहभाग असतो. सुरुवातीला महादेवराव हुरपडे यांनी संमेलनाच्या सुरुवातीपासूनची माहिती दिली. या वेळी संयोजक रामकिशोर श्रीवास, निमंत्रक सर्वेशचंद्र कटियार, डॉ. रामप्रकाश वर्मा, डॉ. प्रदीप शर्मा उपस्थित होते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...