आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खाच्या खाईत ढकलू नका, नागरिकांसह लोकप्रतिनिधी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- ‘आम्हीआमच्या गावात सुखी आहोत. हद्दवाढ करून आम्हाला दु:खाच्या खाईत ढकलू नका, अशी आर्त विनवणी गावकऱ्यांनी केली. २४ गावातील शेतकरी, नागरिक लोकप्रतिनिधी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
महापालिका हद्दवाढीबाबत महाराष्ट्र शासनाने १७ मार्च रोजी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामध्ये शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतींमधील २४ गावांचा समावेश करण्यात अाला अाहे. १७ एप्रिलपर्यंत अमरावतीच्या महसूल आयुक्तांकडे हरकती नोंदवण्याची मुदत दिली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीने महापालिका हद्दवाढीचा ठराव घेऊन विरोध नोंदवला आहे.
महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी नागरिकांनी हद्दवाढीला विराेध केला अाहे. शासनाने अकोला शहर हद्दवाढीचा घेतलेला निर्णय दुर्दैवी असून, त्याचे विपरीत परिणाम शहरी ग्रामीण भागातील लोकांना भोगावे लागणार आहेत. शहर एकेकाळी ख्यातनाम होते, मात्र आज भकास झाले आहे. मूलभूत सुविधा नसल्याने या शहरातील अनेक युवक सुजाण नागरिकांनी शहराला नाकारून ग्रामीण भागात वास्तव्य करणे सुरू केले आहे. शहरातील नागरिक विविध समस्यांचा सामना करत असताना आणखी या २४ गावांचा भर महापालिका प्रशासन कसा पेलू शकेल, हा प्रश्न आहे. शिवाय ग्रामीण भागात आर्थिक परिस्थितीने कमकुवत लोक राहतात. अशा डबघाईस आलेल्या विकास नसलेल्या शहरात तीन लाख लोकसंख्या असलेल्या २४ ग्रामपंचायतींचा समावेश करण्याचा निर्णय घेणे दुर्दैवी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. या आंदोलनात माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे, दादाराव मते पाटील, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे, ज्योत्स्नाताई चोरे, दामोदर जगताप, सरला मेश्राम, सरपंच प्रल्हाद ढोरे, कृती समिती अध्यक्ष प्रवीण पातोडे, शंकर बिरकड, भौरद सरपंच सविता डिगे, देवेश पातोडे, श्रीकांत सिरसाठ, प्रशांत भटकर, मनपा गटनेते गजानन गवई, राजकुमार मुलचंदाणी, अजय तापडिया, सरपंच प्रकाश रेड्डी यांच्यासह शेतकरी, नागरिक बहुसंख्येने मोर्चात सहभागी झाले होते. हद्दवाढीच्या विरोधाचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदय राजपूत यांना सादर करण्यात आले.

बैलगाडी घेऊन शेतकरी सहभागी
या माेर्चात सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. २४ गावातील नागरिकांना हद्दवाढ नको असल्याने शेतकरीसुद्धा या मोर्चात बैलगाडी घेऊन सहभागी झाले होते. दुपारच्या तप्त उन्हात शेतकऱ्यांनी हद्दवाढीला विरोध दर्शवण्यासाठी पुढाकार घेतला.

विद्यार्थ्यांचे होऊ शकते शैक्षणिक नुकसान
यासर्वांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळांवर अवलंबून राहते. अकोला महापालिकेच्या शाळांची दुरवस्था पाहिली आहे. त्यामुळे यांच्यासारखीच परिस्थिती पुन्हा या गावातील मुलांची होऊन आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.

हद्द वाढीविरोधात उपजिल्हाधिकारी उदय राजपूत यांच्याकडे निवेदन देताना हरिदास भदे, चंद्रशेखर पांडे, दादाराव मते पाटील, ज्योत्स्नाताई चोरे, दामोदर जगताप, सरला मेश्राम, सरपंच प्रल्हाद ढोरे इतर लाेकप्रतिनिधी.