अकोला - ट्रकचालकाचाखून करणाऱ्या क्लीनरला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ३१ डिसेंबर २०१५मध्ये एमआयडीसीतील फेज क्रमांक मध्ये ट्रकचालकाची निर्घृण हत्या केली होती.
३१ डिसेंबर २०१५ रोजी उत्तरप्रदेश येथील विनाेदकुमार त्रिभुवनसिंग हा स्वत: ट्रकचालक मालक तर त्याचा सोबत क्लीनर पवनकुमार कृपाशंकर त्रिवेदी हे दोघे डाळीने भरलेला ट्रक घेऊन अकोल्यात आले होते. गजानन उद्योगच्या समोर त्यांनी ट्रक उभा केला होता. त्या रात्री या दोघांमध्ये वाद होऊन पवनकुमार याने विनोदकुमारला लोखंडी टॉमीने मारहाण केली तो पळून गेला होता. त्यानंतर विनोदकुमार हा रात्री रक्तबंबाळ अवस्थेत निर्वस्त्र रस्त्यावर मदतीची याचना करीत होता. दरम्यान गजानन उद्योगाचे मालक भाला यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक हर्षल चापले यांना माहिती दिली. त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी विनोदकुमार याला जखमी अवस्थेत सर्वोपचार रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यावरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संजय मिश्रा यांनी केला. त्यांनी उत्तरप्रदेशातून आरोपी पवनकुमार याला अटक केली. तपासानंतर ठाणेदार अन्वर एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ. घ्यारे जाधव यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश ख्वाजा यांच्या न्यायालयात झाली. सरकारपक्षातर्फे अॅड. विनोद फाटे यांनी १३ साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी पवनकुमारला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा, पाच हजार रुपये दंड दंड भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षाच्या वतीने अॅड. विनोद फाटे यांनी बाजू मांडली.