आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक छळ प्रकरण : संस्थाचालक गोयनका, रुंगटा पोलिसांना शरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष निरजंनकुमार गोयनका व सचिव जुगलकिशोर रुंगटा हे दोन्ही आरोपी सोमवारी पोलिसांना शरण आले. त्यांच्यावर २८ वर्षीय युवकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हे दोन्ही आरोपी महिनाभरापासून फरार होते. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

एक २८ वर्षीय युवक सन २००७ पासून भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेतील मुलींचे वसतिगृह आणि बागेत रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करत आहे. त्याला नोकरीत कायम करून घेण्याचे आमिष दाखवून त्याच्यावर जून २०१५ पर्यंत अनैसर्गिक बलात्कार केल्याचा आरोप गोयनका आणि रुंगटा यांच्यावर आहे. पीडित युवकाने त्याची चित्रफितही माध्यमांना दाखवली हाेती. पोलिसांनी त्यावरून या दाेघांवर कलम ३७७, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार होते. या दरम्यान त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला होता. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत त्यांनी नागपूर खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर दोघांनाही अंतरिम जामीन मिळाला होता. अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज खारीज केल्यामुळे आरोपींनी आपला अर्ज मागे घेतला होता. या वेळी न्यायालयाने आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोपी सोमवारी सकाळी १० वाजता सिव्हिल लाइन्स पोलिसांना शरण आले. त्यांना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस. एस. जांभळे यांच्या न्यायालयात हजर केले असता सरकार पक्ष व आरोपी पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
असा झाला युक्तिवाद
आरोपीकडून अनेक बाबींचा तपास करायचा असल्यामुळे पोलिसांनी आरोपींच्या दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यावर आरोपींचे वय लक्षात घेता कमीत कमी पोलिस कोठडीची मागणी आरोपीच्या वतीने करण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार.