आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल विभागामधील ७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - एप्रिल-मेदरम्यान बदल्यांचे वारे वाहू लागले की, आपली बदली होऊ नये किंवा झाली तर गावातच व्हावी, जास्तीत जास्त विभाग बदलण्यात यावा, अशी सेटींग जिल्हा परिषदेमध्ये मोठया प्रमाणात होत असल्याने आजही काही कर्मचारी आपला ठिय्या एकाच ठिकाणी ठेऊन आहे. तर अशांच्या तालावर जिल्हा परिषदेचे अधिकारीही चालत असल्याचे चित्र आहे. असाच प्रकार आता महसूल विभागातही होत असून, अनेकांचे चांगभलं झाल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहे. महसूल विभागातील एकूण ७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या २५ मे रोजी करण्यात आल्या आहेत. यामध्ये ४८ अव्वल तर २४ कनिष्ठ लिपिक आहेत. 
 
महसूल प्रशासनात जिल्हाधिकारी कार्यालयातच अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी पद ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या असतांनाही प्रभारी आहे. उप विभागीय अधिकारी पदी निलेश टापरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे रिक्त असलेले हे पद भरण्यात आले आहे. सध्या बदल्यांच्या माहौलात खामगावातील उप विभागीय अधिकारी यांचे पद भरल्या गेले असून,बुलडाणा निवासी उप जिल्हाधिकारी पदी ललित वऱ्हाडे हे सोमवारी रुजु होणार आहे. प्रशासनाचा हा डोलारा सांभाळणारे मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांच्या बदल्या अद्याप होणे बाकी असून, अव्वल कारकून कनिष्ठ लिपीकांच्या बदल्या २५ मे रोजी झाल्या आहेत. या बदल्या विनंती प्रशासकीय बदल्या असल्याने यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता नसल्याचा दावा प्रशासन करु शकत असले तरी कही खुशी कही गम या बदल्यांमधून दिसून येत आहे. 

काहीतर उबगले; पण बदली नाही 
काही टेबल असे असतात, तिथे काहीच मिळत नाही. पण काम असते तर एखादा टेबल असा असतो की तिथे मिळत पण नाही कामही नसते. अशा काही विभागात काही कर्मचारी काम करत आहेत. तेथे बसुन ते उबगले असतीलही परंतु, त्यांची बदली दहा ते पंधरा वर्ष होऊनही झाली नाही. जिल्हाधिकारी कार्यालय सोडुन काही तहसीलला जातात. तहसील सोडले की जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. जिल्हाधिकारी कार्यालय सोडले की उप विभागीय कार्यालयात जातात. ते साेडले की अपर जिल्हाधिकारी कार्यालयात जातात. साहेबांनी इतिहास बघितल्यास बगिच्यातच फिरणारेही नजर के सामने येतीलच! 

पाहुणा आला अन् घरजावई बनला : निवडणुक, जनगणना राष्ट्रीय कार्यक्रमात बरेच कर्मचारी पाहुणे म्हणुन जिल्हा प्रशासनाच्या मदतीला बाेलविले जातात. असेच काही कर्मचारी कोठे पाठविले असतील तर त्या संबधित विभागाला कळले नसतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले म्हणुन बोलविले नसतील. असे कर्मचारीही काहीच काम नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारायच्या अन् पगार मुळ आस्थापनेवरील घ्यायचा. निवडणूक कामात आलेला असा पाहुणा जिल्हाधिकारी कार्यालयात निश्चितच सापडेल. 

जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार हे बुलडाणा जिल्ह्यात यापूर्वी अधिकारी म्हणून कार्य करुन गेले होते. त्यांनी हिरव्यागार असलेल्या तत्कालीन बुलडाण्याला बघितले होते. परंतु आता नव्याने बुलडाणा येथे जिल्हाधिकारी म्हणुन रुजु झाल्यानंतर त्यांना वातावरणात गरमी जाणवायला लागली आहे. असेच वातावरण काही वर्षांपुर्वी महसूलचे होते. तेव्हा बदल्यांमध्ये बुलडाण्याच्या सावलीतच राहणारे कर्मचारी होते. मात्र तेव्हाही अनेकांना सावलीबाहेर पाठवणारे निश्चित होते.आता बुलडाणा हिरवागार निश्चित नसेल पण महसूलचे वातावरण आजही बदल्यांबाबत दुषितच आहे. जिल्हाधिकाऱ्यांंनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...