आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाड: भक्तांच्या साक्षीने पार पडली सैलानी बाबा यात्रेतील होळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैलानी यात्रेमध्ये नारळाची पारंपरिक होळी साजरी करण्यात आली. यावेळी होळीत नारळ, बिब्बे, बाहुल्या जाळण्यात आल्या. - Divya Marathi
सैलानी यात्रेमध्ये नारळाची पारंपरिक होळी साजरी करण्यात आली. यावेळी होळीत नारळ, बिब्बे, बाहुल्या जाळण्यात आल्या.
धाड - सर्व धर्म समभावाचे प्रतिक म्हणून नावारुपास आलेल्या सैलानी बाबांच्या पिंपळगाव सैलानी येथील यात्रा महोत्सवाला आज रविवार, १२ मार्च रोजी पाच वाजता होळी पासून सुरुवात झाली आहे. या होळीसाठी भाविक भक्तांचे लोंढे सैलानीत दाखल झाले असून, होळीमध्ये मोठ्या प्रमाणात नारळ,अंगावरील जुने कपडे, बिबे, लिंबू, कापडी बाहुल्या ओवाळून होळीमध्ये फेकून भाविक भक्तांनी आपली सैलानी बाबांवरील श्रद्धा कायम ठेवली. 
 
हाजी अ.रहेमान उर्फ सैलानी बाबा यात्रा महोत्सव दरवर्षी होळीच्या दिवसापासून सुरू होते तर होळीच्या पाचव्या दिवशी मुख्य संदल असतो. या यात्रा महोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने सर्व धर्मीय भाविक येत असून, तब्बल पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवाची सुरुवात होळीपासून झाली आहे. यावर्षी १७ मार्च रोजी संदल चढणार आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविक तात्पुरत्या स्वरुपात झोपड्या, कापडी तंबू तसेच कापडाच्या झोपड्या करून वास्तव्य करणार आहेत.तर निवासाची सोय उपलब्ध असल्याने भाविकांनी महिन्याभरापूर्वीच खोल्या बुक करून ठेवल्या आहेत. 
 
यात्रेतजातांना रहदारीस अडचण: सैलानीयेथे जाण्याकरता दुधा ते वाडी रस्ता बंद करण्यात आला आहे. तर पिंपळगाव सराई येथे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे भाविकांना खांद्यावर ओझे घेऊन यात्रेला जावे लागत आहे. त्यामुळे भाविकांची अडचण झाली आहे. तर यात्रेतही जागोजागी रहदारीस अडचण निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी वाहने अडविण्यात येतात त्या ठिकाणी तर वाहने पलटविण्याची गर्दी आहे. पाण्याच्या टँकरला आत सोडण्यासाठी स्थानिक पोलिसांशी तजवीज करावी लागत आहे. 
 
अनुचित प्रकार टाळण्यासाठी होळीभोवती लावले बॅरीकेट 
होळी जळतांना नागरिक,भाविक हे आपल्या मनोरुग्ण नातेवाईकांसोबत होळीत कपडे, बिबे, गोटे, कापडी बाहुल्या अंगावरून ओवाळून टाकतात. काही मनोरुग्ण भाविक यावेळी आपल्या अंगावरील कपडे, बूट, चप्पल यासारखे सामान टाकतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून बॅरीकेट लाऊन भाविकांना थांबवले होते. 
 
होळीला पोलिस बंदोबस्त सज्ज 
यात्रेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्हाधिकारी डॉ. झाडे नियोजनावर लक्ष देऊन आहेत. यासोबतच यात्रेत येणाऱ्या भाविकांची लक्षनिय संख्या पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी कायदा सुव्यवस्थेसोबतच नागरिकांच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी यांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. 
फातेहखानीने होणार यात्रेचा समारोप 
 
कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा,जम्मू काश्मीर,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश या सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक यात्रेत येत आहेत. होळी पासून सुरू होणाऱ्या यात्रेदरम्यान १७ मार्च रोजी पिंपळगाव येथून संदल निघून सैलानी दर्गा मुजावर यांच्या घरातून निघून मुख्य दर्गाहवर चढतो. त्यानंतर फातेह खाणीने यात्रेचा समारोप होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...