आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संग्रामपूर तालुक्यातील नदी- नाल्यांतून रेतीची चोरटी वाहतूक सुरूच, महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रामपूर - मागील काही दिवसांपासून तालुक्यातील नदी नाल्यांना रेती तस्करांची काळी नजर लागली आहे. या नदी- नाल्यातून सर्रास रेतीचे उत्खनन करून त्याची ट्रॅक्टर इतर वाहनाद्वारे अवैधरित्या वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे नदी -नाल्यात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. दिवसाकाठी शेकडो ब्रास रेतीची तस्करी करण्यात येत आहे.
 
त्यामुळे शासनाच्या तिजोरीला फटका बसत आहे. दिवसाढवळया रेतीची वाहतूक होत असताना देखील अद्याप महसूल प्रशासनाने एकाही वाहनावर कारवाई केली नाही. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका उपस्थित केल्या जात आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता रेती तस्करीवर आळा घालण्यात यावा, अशी मागणी होत आहे. 
 
आदिवासी बहुल म्हणून ओळख असलेल्या संग्रामपूर तालुक्यात वाण, पांडव, केदार, लेंडी सातलोन या नद्यांसह अनेक रेती उत्पादित नाले आहेत. या नदीवर अनेक गावांच्या पाणी पुर्वठा योजना कार्यान्वित आहेत. पंधरा दिवसापूर्वी तालुक्यात दमदार पाऊस झाल्यामुळे नदी- नाल्यांना पुर् आला होता. सदर पुर ओसरल्या नंतर अनेक नदी -नाल्यांमध्ये रेतीचे साठे निर्माण झाले आहेत. हीच संधी साधून तालुक्यातील अनेक रेती तस्करांनी या नदी- नाल्यांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. या नदीतून नियमबाह्य रेतीचे उत्खनन करून त्यांची ट्रॅक्टर, मेटॅडोर इतर वाहनाने सर्रास वाहतूक केल्या जात आहे. अवैधरित्या रेतीचे उत्खनन होत असल्यामुळे नदी- नाल्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी भरमसाठ रेती उपशामुळे पाण्याचे सिंचन होता, ते सरळ वाहून जात आहे. 

त्यामुळे भविष्यात नदी काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची दाट शक्यता आहे. शिवाय जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. वास्तविक पाहता यंदा तालुक्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. आतापर्यंत पडलेला पाऊस हा फक्त पिकांसाठी पोषक ठरला आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, तालुक्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यातच नदी- नाल्यातून दिवसाढवळ्या रेतीची वाहतुक होत आहे. हीच रेती बांधकाम मालकांना अव्वाच्या सव्वा भावात विकून रेती तस्कर आपली तुंबडी भरत आहेत. वास्तविक पाहता गौण खनिजाला आळा बसवा, यासाठी तहसिल प्रशासनाने पथकाची निर्मिती केली आहे. परंतु या रेती तस्कराकडे पथक हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याची शंका येत आहे. 
 
अन्यथा अांदोलन करण्यात येईल 
मागील काहीदिवसांपासून तालुक्यात सर्रास रेतीसह गौण खनिजांची तस्करी करण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे महसूल प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. 
- नारायण ढगे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 
 
हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार करणार 
गौणखनिज तस्करीला आळा बसावा, यासाठी तहसील प्रशासनाने पथकाची निर्मिती केली आहे. परंतु कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात येईल. तसेच शक्यतोवर रात्रीला गौण खनिजांची चोरी करण्यात येत आहे. परंतु शासकीय वाहन नसल्याने घटनास्थळी पोहचू शकत नाही. तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीत गौण खनिजांची चोरी करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. 
- एल.के.चव्हाण, तहसीलदार 
 
बातम्या आणखी आहेत...